ऐकाव ते नवलच; पोपट शिट्टी मारत असल्याने मालकावर गुन्हा दाखल
पुणे : पोपटाचे ‘मिठु मिठु..’बोलणे त्याचा आवाज ऐकणे हे अनेकांसाठी मजेची, आनंदाची गोष्ट असते. परंतु, पोपटाच्या शिट्ट्या मारण्याच्या आवाजावरून कधी गुन्हा दाखल झाल्याच ऐकलय. असा आगळावेगळा गुन्हा पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शेजारच्यांचा पोपट वारंवार शिट्या मारतो, या कारणावरून भांडणं झाली असून शेजाऱ्यांनी पोपट मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश अंकुश शिंदे यांनी या बद्दल पोलिसात तक्रार दिली आहे. तर शिंदे यांचे शेजारी अकबर अमजद खान यांच्यावर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात भादवि. ५०४, ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे आणि खान हे दोघे ही हे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर इथं एकमेकांच्या शेजारी राहतात. ‘तुमचा पोपट सारखा ओरडत असतो. तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा” असं सांगितलं. या कारणावरून पोपट मालक खान यांनी शिंदे यांना शिवीगाळ करून तक्रारदार यांना मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
