राष्ट्रसेवा हे जगण्याचे ध्येय असले पाहिजे – सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे
पुणे : फक्त सुंदर दिसणे म्हणजे सुंदर असणे नाही. तर आपले विचार आणि आचार सुंदर असणे म्हणजे खरे सौंदर्य आहे. आज मुलींनी फक्त दिसण्याकडे न बघता देशासाठी काहीतरी करण्याची उमेद बाळगली पाहिजे. राष्ट्रसेवा हे आपल्या जगण्याचे ध्येय असले पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
गुरूवार पेठेतील वीर शिवराय मंडळाच्यावतीने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठविण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, व्यावसायिका जाई देशपांडे, महिला बाउन्सर दिपा परब, पियुष शाह, राम बांगड, वीर शिवराय मंडळाचे किरण सोनिवाल, अनिकेत यादव अक्षय पानसरे, रोनक शेलार, गीता पाटील, अभिषेक मारणे, सचिन पवार, गंधाली शाह, गजानन सोनावणे, सागर कांबळे श्री शिवाजी मराठा संस्थेचे सचिव अण्णा थोरात, गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा खानविलकर, जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उर्मिला चव्हाण आदी उपस्थित होते.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, बलिदान म्हणजे काय, शहीद म्हणजे काय हे आजच्या विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्या. शत्रूबरोबर लढताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नी देखील सैन्यदलात भरती होऊन देशासाठी लढत आहेत. अशा महिलांचा आदर्श आजच्या मुलींनी घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
किरण सोनिवाल म्हणाले, सीमेवर लढणाऱ्या आणि कुटुंबापासून दूर असणाऱ्या सैनिकांसाठी प्रेम व आपूलकीचे बंधन म्हणून राख्या पाठविण्यात येत आहेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले. मंडळाच्यावतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.