fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

मेट्रोने डीपी रस्ताच केला गायब!-आम आदमी पार्टीने केली भांडाफोड

पुणे : अनेकदा सरकारच्या विभागाविभागात ‘ एकमेका करू सहाय्य आणि अवघे धरू सुपंथ ‘ या तत्वावर  एक विभागाची चूक दुसरा विभाग चालवून घेतो आणि अश्या अनेक अनियमितता चालवून घेतल्या जातात. जनतेचा पैसा वाया जातो पण दोषी कुणीच नसतो. आता स्मार्ट पुण्यात मेट्रो रेल विभागाने थेट डीपी रस्ताच गायब केला आहे आणि याचा पत्ता ना आयुक्तांना , ना बांधकाम विभागाला , ना मालमत्ता व्यवस्थापन विभागाला , ना स्थानिक भाजपच्या नगरसेवक , आमदारांना ! आम आदमी पार्टीने आज याची भांडाफोड केली आहे.

आप चे शंकर थोरात यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करीत सर्व बाबी उघड केल्या आहेत. जून पासून या संदर्भात महानगरपालिका, मेट्रो आणि शेतकी महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे. शिवाजीनगर वाकडेवाडी येथे साखर संकुल , जवळून हा रस्ता नियोजित आहे. हा रस्ता वाकडेवाडी येथून रेल्वे मार्गाला समांतर खडकी येथपर्यंत व तेथून सिंचन विभागाकडे प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे मेट्रो प्रवासी, रेल्वे प्रवासी व स्थानिक रहदारी ही जुन्या महामार्गावर न जाता या समांतर रस्त्याने होईल. परंतु आता मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने थेट या रस्त्यावर अतिक्रमण करीत येथे रूळ टाकून ही जागा ताब्यात घेतली आहे. या रस्त्यामुळे रेल्वे व मेट्रोसाठी सर्विस रोड स्वरूपाचा या रस्त्याचा उपयोग होणार होता. आता हा रस्ताच बंद झाल्याने पुढील काळात वाहतुकीवर परिणाम होऊन कोंडी होणार आहे.

या बाबत शंकर थोरात यांनी तक्रार दिली आहे तसेच मेट्रो रेल चे कार्यकारी संचालक गाडगीळ यांना याची पूर्ण माहिती या पूर्वीच दिली आहे. मेट्रोचे गाडगीळ यांनी याबाबत अनेक दिवस चालढकल केली त्यामुळे आपचे शंकर थोरात , शिवाजीनगर चे अध्यक्ष सतीश यादव आणि आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून याबाबत तातडीने पाऊले उचलण्याबाबत निवेदन दिले आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मालमत्ता विभागाने ही जागा ताब्यात घेण्याची आवश्यकता असताना प्रशासन व मेट्रो अधिकारी गाडगीळ , मेट्रो साईट डेपो इन्चार्ज ब्रिजेश भट्टाचार्य हेही तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. मात्र आम आदमी पार्टी याबाबत गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. सतत चुकणारे ओव्हर ब्रिज , चुकलेले अंडर पास आणि आता गायब डीपी रस्ता ही सर्व स्मार्ट सिटीतील अंदाधुंद कारभाराच्या खुणा आहेत. ( सोबत डीपी नकाशा , अतिक्रमणाबाबत बांधकाम विभागाचा अभिप्राय रस्ता जमीन ताब्यात घेतली नसल्याची माहिती व आप च्या तक्रारीच्या प्रती सोबत जोडल्या आहेत)      
हा रस्ता मा आमदार अनिल भोसले यांच्या ऑफिस शेजारून सुरू होतो परंतु त्यांचे व आमदार शितोळे, इतर नगरसेवक यांचे मौन म्हणजे बेफिकिरी व जनतेशी तुटलेली नाळ आहे. अशी टीका आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किदत यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading