शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीतील असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला अटक केली होती. त्यानंतर 3 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज त्यामध्ये पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.