fbpx

देवेंद्र फडणवीस यांनी आपले चाणक्यत्व पणााला लावावे धनगर विवेक जागृतीची मागणी

बारामती ः विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधुनिक चाणक्य असल्याचा प्रचार त्यांचे समर्थक करत असतात. त्यांनी त्यांचे चाणक्यत्व धनगर एसटी आरक्षणप्रश्नी पणाला लावून स्वतः बारामतीत दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले.

धनगर विवेक जागृती अभियानाच्यावतीने बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोणे बोलत होते. दि. २९ जुलै २०१४ रोजी बारामती येथे झालेल्या धनगर आंदोलनाला उपस्थित राहिलेले भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात पाच वर्षे आरक्षण देण्याच्यादृष्टीने एकही सकारात्मक कृती केली गेली नाही. आता अडीच वर्षांच्या कालखंडानंतर पु्न्हा त्यांची सत्ता आलेली आहे. त्यामुळे अपुर्ण राहिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे विक्रम ढोणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा धनगर एसटी आरक्षणाचे आश्वासन दिलेले आहे. त्यांच्याकडूनही समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला असल्याबाबतची विधाने केली आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासह धनगर आरक्षणाबाबत ममत्व दाखविणाऱ्या भाजप नेत्यांनी याप्रश्नी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी तो करावा, अशी अपेक्षा असल्याचेही ढोणे यांनी सांगितले.

दरम्यान, धनगर एसटी आरक्षणप्रश्नी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, आरक्षणप्रश्नी तातडीने मंत्री समिती स्थापन करावी, देवेंद्र फडणवीस यांनी बारामती दिलेल्या आश्वासनाचा कृतीकार्यक्रम जाहीर करावा, आदी मागण्यांचे निवेदन बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विक्रम ढोणे यांच्यासह किशोर मासाळ, गणपत आबा देवकाते, मुरलीधर ठोंबरे, युवराज हाके, धनाजी हजारे, सुनील शेजाळे, अण्णासो टेंगले, रवी कित्तूरे, बाळू मासाळ, सागर खांडेकर, अप्पासो भिसे,नागेश शेजाळे, यशवंत कोळेकर, रणजित सोलवणकर, संदीप गोफणे,अमोल चोपडे अमोल कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: