fbpx

हवामान बदल आणि डिजिटल परिवर्तन ही नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तींसाठी प्रमुख आव्हाने – डॉ चौधरी

पुणे :  “ हवामान बदल आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या नव्या स्थितीला समर्थपणे तोंड देण्यास सिद्ध अशी उद्योग-व्यापारी संस्था उभी करणे हे आजच्या काळात नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे आव्हान आहे,’’ असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक – अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी यांनी  केले. ऊर्जा वापराचे नवे मार्ग शोधणे आणि त्यांचे अवलंबन करणे ही आता ऐच्छिक गोष्ट उरली नसून, ती एक जबाबदारी झाली आहे.  खनिज तेलासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांकडून पुनर्वापर योग्य ऊर्जा अथवा जैविक ऊर्जा वापराचा पर्याय स्वीकारण्यासाठी आवश्यक बदल सर्वच क्षेत्रातील नेतृत्व करण्याऱ्यांनी अंगिकारला पाहिजे असेही त्यांनी सूचित केले.

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स च्या पुणे शाखेच्या वार्षिक संमेलनात विशेष अतिथी म्हणून डॉ. चौधरी बोलत होते. कार्यक्रमात डॉ. चौधरी यांचा अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील उपमुख्य अधिकारी स्कॉट टिकनर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सत्कार डॉ चौधरी यांच्या जैवइंधन क्षेत्रातील योगदानासाठी करण्यात आला. याप्रसंगी चेंबर’च्या पुणे शाखेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोटस्थाने, पश्चिम विभागीय कार्यालयाचे प्रमुख सौरभ शाह उपस्थित होते.  सदर कार्यक्रम नुकताच हॉटेल वेस्टीन येथे संपन्न झाला.

अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील उपमुख्य अधिकारी स्कॉट टिकनर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, “भारत अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत खूप सकारात्मक  बदल होत आहेत आणि एकेकाळी काहीशा दबलेल्या आणि संशयग्रस्त वातावरणापासून आता उभय  देश संरक्षण, दहशतवादाचा मुकाबला, उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात सहकार्याच्या नव्या वाटा चोखाळत आहेत.  उभय देशातील व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर या पातळीला पोचावा या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत आणि हे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आयात कर कमी करणे, आंतरराष्ट्रीय मानकांचा अवलंब, माहितीची खुली देवाणघेवाण, नियमन प्रक्रिया स्थिर असणे आणि इ कॉमर्स व्यवहारांवरील बंधने कमी करणे हे आवश्यक आहे. ” पर्यावरण रक्षण, सामाजिक लाभ आणि प्रामाणिक कार्यपद्धती या त्रिसूत्रीवर चालणा-या  व्यवसायांची गेल्या काही वर्षात पाचपट भरभराट झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारत अमेरिका व्यापारी संबंध सुदृढ करण्याच्या कामात इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स करत असलेल्या योगदानाचा उल्लेख करून चेंबर च्या अध्यक्ष प्राजक्ता कोटस्थाने म्हणाल्या, ” या वर्षात चेंबर ने शाश्वत व्य्ववसाय पद्धतींवर भर दिला आणि महिला उद्योजकांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू ठेवले. अमेरिकेतील विविध संस्थांनी डॉ चौधरी यांच्या जैव ऊर्जा आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना दिलेल्या बहुमानांच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करताना चेंबर ला अत्यंत आनंद होत आहे.  भारत अमेरिका व्यापार उद्योग पुढे नेताना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना पुरेसे उत्तेजन देण्याची भूमिका यापुढेही चेंबर चालू ठेवील.

कमिन्स इंडियाच्या पॉवर सिस्टिम्स व्यवसायाचे उपाध्यक्ष मंदार देव, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स च्या बिझनेस टू कन्झ्युमर व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम श्रीवास्तव यांची देखील यावेळी भाषणे झाली. नताशा रॉडरिग्ज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: