Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेतील बोगस अभियंता विरोधात आपचे तीव्र आंदोलन

पुणे : संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग आणि स्थापत्य विभाग हे बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची कोणतीही मान्यता नसताना जे आर एन राजस्थान विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या 18 बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांच्या पदोन्नतीचा घाट महापालिकेमध्ये घातला जात आहे. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा पद भरती चालू असून त्याबाबत होणाऱ्या गोंगाटाचा फायदा घेऊन निमुटपणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी डीपीसी ( डिपार्टमेंट प्रमोशन कमिटी) बैठक आयोजित करून या 18 बोगस अभियंता पदोन्नती देण्याचा डाव पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. या विरोधामध्ये आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर तीव्र आंदोलन करून याचा विरोध दर्शविण्यात आला.

जोपर्यंत याबाबत आम आदमी पक्षाने घेतलेला आक्षेपांची पूर्तता होत नाही तोपर्यंत याप्रकरणी डीपीसी बैठक घेण्यात येऊ नये आणि नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे. 2015 वर्षीच्या यादीतील 11 बोगस अभियंते, 2018 वर्षीच्या यादीतील 4 बोगस अभियंते, 2019 वर्षीच्या यादीतील 9 बोगस अभियंते आणि 2021 वर्षीच्या यादीतील 18 बोगस अभियंते अशा एकूण 42 बोगस अभियंत्यांची बडतर्फी करून त्यांच्यावर पुणे मनपाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने केली गेली.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि पंजाब – हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात आम आदमी पक्षाच्या वतीने राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, शहर संघटक एकनाथ ढोले, विद्यानंद नायक, वैशाली डोंगरे, किरण कांबळे, प्रथमेश बेलदरे, रोहन रोकडे, सुजित अग्रवाल, जयश्री डिंबळे, मीरा बीघे, कुमार धोंगडे, किरण कद्रे, अमोल काळे, निरंजन आडागले, सचिन कोतवाल, अशोक हरफळे, नरेंद्र देसाई, माधुरी गायकवाड, फेबियन सॅमसन, दत्तात्रय भांगे, अंजली इंगळे, सुनील वाल्हेकर आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

“संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत असताना पुणे महानगरपालिकेचे प्रशासन पालिकेमधील बोगस अभियंत्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, ही विद्यानगरी पुणे शहरासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट प्रशासनामुळेच संपूर्ण शहर खड्ड्यात गेलेले आहे. ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची गुणवत्ता, ज्ञान देखील पालिकेच्या अभियंत्यांमध्ये नाही. भ्रष्ट, अकार्यक्षम, कोणतीही पात्रता नसणारे बोगस अधिकारी जर शहर चालवू लागले तर ती पुणेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. यातील सर्व 42 बोगस अभियंत्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे”, असे मत आपचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading