fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : आज भारत वेगवेगळया क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळया क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. आजादी का अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. हर घर तिरंगा या अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळया माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठया प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठया उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात आपली वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळया क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी, उत्पादन, सेवा, सहकार , शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटत असल्याचे केंद्रीय गृह मंत्री यावेळी म्हणाले. आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्रय मिळविताना अनेक संकटांचा सामना केला मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरु करावी. हर घर तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया या माध्यमांचा सुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा असेही  शहा यावेळी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: