fbpx

महागाई विरोधात ‘आप’ कडून काढण्यात आली गॅस सिलेंडर व विजेची अंत्ययात्रा

पुणे : :मागील काही वर्षातील वाढत्या महागाईचे अक्राळ-विक्राळ रूप बघून सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. “बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” हे ब्रीदवाक्य घेऊन २०१४ साली सत्तेवर आलेले मोदी सरकार गेल्या ८ वर्षांत विकासाच्या गाडीला ब्रेक लावून महागाईची एक्सप्रेस मात्र सुसाट वेगाने पळवत आहे.

या बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी (आप) ने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून या प्रचंड भाववाढीचा कडाडून विरोध केला आजच्या अंत्ययात्रा द्वारे. ही गॅस सिलिंडर व विजेची अंत्ययात्रा मोलेदिना रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते, संविधानिक पद्धतीने व सर्व नियमांचे पालनकरित, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. या यात्रेत महागाई व भ्रष्टाचाराचा राक्षस, यम यांच्यासोबत ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरात सर्वसामान्य व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक वस्तूचे भाव आज आकाशाला भिडले आहेत. घरघुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीने रु. १००० चा टप्पा ओलांडला आहे. वर्षभरात सिलेंडर दरात तब्बल रु. २५० पेक्षा अधिक दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर तर सातत्याने वाढविण्यात येत आहेत. क्वचितच अपवाद म्हणून २० रुपयांनी वाढवलेले दर तोंडदेखले म्हणून ५-१० रुपयांनी कमी केले जातात, हे जनतेला समजत नाही असे भाजपाच्या केंद्र सरकारने समजू नये.”

आधीच गॅस सिलिंडर व इंधन दर वाढीने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले होते. आतातर, महाराष्ट्रात होवू घातलेल्या वीज दरवाढीच्या ‘शाॅक’ने आणि केंद्र सरकारच्या नवीन जी.एस.टी. धोरणानुसार जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या कराने, महागाईच्या या आगीत पेट्रोल ओतले गेले आहे. आप पुणे या विध्वंसक महागाईचा, आजच्या या आंदोलनाद्वारे, तीव्र निषेध करीत आहे.

आप पुणेचे श्रीकांत आचार्य, माजी न्यायाधीश मंजूषा नयन,  डॉ अभिजीत मोरे, सुदर्शन जगदाळे, विद्यानंद नायक, फेबियन आण्णा सॅमसन, सीमा गुट्टे, निरंजन अडागळे, अंजली लोखंडे, सुनंदा जाधव, किरण कांबळे, किरण कद्रे, आनंद अंकुश, गणेश ढमाले, एकनाथ ढोले  व इतर कार्यकर्त्यांनी भर पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: