fbpx

संतांच्या रचना सादर करीत रंगला भक्तीचा सोहळा

पुणे : ज्ञानेश्वर माऊलींची रचना असलेली ‘येई वो येई, रंगा येई वो येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई’ ही विराणी…पं.राजेश दातार यांनी संगीतबद्ध केलेली गवळण ‘उडवू नको रंग थांब थांब कृष्ण’…संत चोखोबा यांची रचना ‘वैकुंठ पंढरी भिवरेच्या तिरी’… ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ अशा एकाहून एक विठ्ठलाचे गुणगान करणाऱ्या रचना सादर करीत भजनरंग कार्यक्रमात भक्तीचा सोहळा रंगला.

सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने भजनरंग हा विठ्ठलभक्ती गीतांचा विशेष कार्यक्रम सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. पं. यादवराज फड, सानिया पाटणकर, संपदा वाळवेकर, आणि पं. राजेश दातार या कलाकारांनी कार्यक्रमात गायन केले. विनीत तिकोनकर, पद्माकर गुजर, आनंद टाकळकर, कुमार करंदीकर, केदार परांजपे या कलाकारांनी सुरेख साथ संगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निरुपण केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने झाला. त्यानंतर गायिका संपदा वाळवेकर यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ या संत तुकारामांच्या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली. पं. राजेश दातार यांनी पंढरपुराचे वर्णन माहेर असे करणारा संत एकनाथ महाराज यांचा अभंग ‘माझे माहेर पंढरी’ सादर करुन रसिकांची दाद मिळविली. सानिया पाटणकर यांनी दृत एकतालातील ‘विठ्ठल माझी माय आम्हा सुखे उणे काय’ हा अभंग सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. पं. यादवराज फड यांनी ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’ सादर करीत उपस्थितांना भक्तीरसाचा आनंद दिला. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा…सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…रुप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी…कानडा राजा पंढरीचा या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. पं. राजेश दातार यांनी गायलेल्या पांडुरंग श्रीरंग भज रे मना या संत तुकोबांच्या अभंगाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: