आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पावसाच्या साथीने रंगली ‘भजनसंध्या’
अमोल निसळ यांचा ‘मला उमजलेली भजन संध्या’ कार्यक्रम संपन्न
पुणे : ‘ माझे माहेर पंढरी ‘, ‘ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन’, ‘जग मे सुंदर है दो नाम ‘,’राम का गुणगान ‘अशा एकाहून एक सरस भक्तीगीतांच्या सादरीकरणाने रसिक भारावले. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला स्वर-सुरांच्या भक्तीमय पावसात रसिक चिंब भिजले.
स्वरनिनाद आयोजित सुप्रसिद्ध गायक अमोल निसळ यांचा ‘मला उमजलेली भजन संध्या’ हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाला.
भजन सम्राट अशी ओळख असलेल्या अनुप जलोटा यांनी गायलेली काही लोकप्रिय भजनं स्वत:च्या विचारातून रसिकांसमोर सादर करत निसळ यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. राम-कृष्ण यांची भजने, संत कबीर, मीराबाई यांच्या रचनांवर आधारित भजन, तसेच जलोटा यांची काही भजने त्यांनी गायली.
निसळ यांनी आपल्या गायनाची सुरवात ‘ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन’ या लोकप्रिय भक्तीगीताने केली. त्यानंतर ‘जग मे सुंदर है दो नाम ‘, जोग – चारुकेशी मिश्र रागातील रचना ‘ वो काला इक बासुरीवाला ‘, ‘कभी कभी भगवान को भक्तो से काम पडे ‘ असे एकाहून भक्तीगीते सादर रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी गायलेल्या ‘राम का गुणगान ‘, ‘ रघुवर तुमको ‘, ‘ मैं नहीं माखन खायो ‘ या गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फूर्त प्रतिसाद दिला. ‘झिनी रे झिनी’ या गीताने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
त्यांना विशाल गंड्रतवार (तबला), रोहीत कुलकर्णी ( की बोर्ड) व निखिल बिडवलकर (संतूर), अलापिनी निसळ (तालवाद्य) सुरंजन जायभाय (संवादिनी) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.