फिडेल सॉफ्टेकच्या भागविक्रीला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद
पुणे: फिडेल सॉफ्टेक लिमिटेड या पुणेस्थित लँगटेक कंपनीच्या शेअरची १० जून २०२२ रोजी शेअर बाजारात नोंदणी होऊन तो गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला व आयपीओ १०२ पटीने ओव्हरसबस्क्राइब झाला.
फिडेल सॉफ्टेक लिमिटेड, लोकलायझेशन आणि आयटी कन्सल्टिंग सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये २००४ पासून कार्यरत आहे. कंपनीतर्फे क्लायंट्सना स्थानिक भाषेतील यूआय/ यूएक्स करण्यासाठी टेक्निकल सोल्युशन्स पुरवली जातात. कंपनीच्या स्थानिकीकरण सेवांमध्ये अनुवाद तसेच सॉफ्टवेअर, वेबसाइट्सचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन), एआय इंजिन प्रशिक्षणासाठी बहु-भाषिक डेटा निर्मिती, ट्रान्सक्रिप्शन आणि अॅनॉटेशन, व्हिडिओ सबटायटलिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, टेस्टिंग आणि ऑटोमेशन यांचा समावेश आहे.
अलीकडेच कंपनीला मिळालेल्या आयपीओ यशाच्या संदर्भात बोलताना फिडेल सॉफ्टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी सर्व गुंतवणूकदार, क्लायंट्स, कार्यसंघामधील सदस्य, कंपनीमधील माजी सहकारीवर्ग तसेच मित्र-परिवार, सहायक आणि हितचिंतकांचे मनस्वी आभार मानले. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, मुख्य वित्त अधिकारी मंदार इनामदार, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुश्रुत पोतदार उपस्थित होते.
सुनिल कुलकर्णी म्हणाले की, “हे यश म्हणजे १८ वर्षांहून अधिक काळामधील आमच्या कार्यसंघातील सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांची तसेच आमचे क्लायंट्स/भागीदारांनी केलेल्या सहकार्याची सुखद परिणती आहे. फिडेल सॉफ्टेक ही भारतातील पहिली लँगटेक कंपनी आहे जिने आपले शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदरांना खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, भौगोलिक स्तरावर जपान-भारत संबंधांना सुरुवात झाल्यापासून त्यावर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक होणारी ही पहिली आयटी आणि कंसल्टिंग सर्व्हिस एसएमई आहे. भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे हे सत्तरावे वर्धापन वर्ष आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी ही बाब खूपच विशेष आहे. स्थानिकीकरण ही जागतिक स्तरावर २६ अब्ज डॉलर्सची मार्केटप्लेस असून त्यामध्ये योगदान देण्याकरिता भारत सज्ज आहे.
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी म्हणाल्या की “कंपनीच्या वाढीच्या वेगाला चालना देण्यासाठी, नवीन मार्केट्सचा विस्तार करण्यासाठी, उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या लोकांना कंपनीमध्ये भरती होण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि नवीन कार्यक्षमता विकसित करण्यासाठी आम्ही उचललेले हे एक पाऊल आहे. सुरक्षितता, पर्यावरणात्मक सुधारणा, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सला (ईएसजी) अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने देखील उचलेले हे एक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. फिडेलटेक सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देणारी कंपनी असून जवळजवळ कंपनीच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांचा डायव्हरसिटी रेशो ५०% आहे.”
कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी मंदार इनामदार यांनी नमूद केले की “ही निधी उभारणी महसूल वाढीला चालना देण्यासाठी असून फिडेलटेक बदलत्या सामाजिक प्रभावावर तितकेच लक्ष केंद्रित करते. स्थानिक भाषा तसेच तंत्रज्ञान कौशल्यांचा लाभ घेण्यासाठी, विकासाच्या बाबतीमध्ये भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील शहरांवर भर देऊन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. तसेच, जपानी भाषेबरोबरच तंत्रज्ञान आणि अन्य भाषांचे पुरेसे प्रशिक्षणही दिले जाईल.”
कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुश्रुत पोतदार यांना भाषा तंत्रज्ञानाच्या कौशल्यांना नवीन पातळीवर घेऊन जाण्याविषयी आत्मविश्वास वाटतो. ते म्हणाले, “स्मार्टफोनचा वाढता प्रसार, डेटा पॅक्सच्या दरांमधील घट आणि व्यवसाय यशस्वी होण्याच्या वाढत्या इच्छाशक्तीमुळे क्लायंट्स ग्लोकल (ग्लोबल + लोकल) होत चालले आहेत आणि म्हणून नाविन्यपूर्ण तांत्रिक सोल्यूशन्सचा वापर करून आम्हाला स्थानिक भाषेमध्ये यूआय/यूएक्स उत्पादने आणि सेवा वितरीत करायच्या आहेत. आम्ही क्लायंट्सच्या या उपक्रमांमध्ये सहकार्य करून अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्हिडिओ-ऑडिओ सोल्यूशन्स, डेटा विश्लेषण, बहु-भाषिक एसईओ आणि सर्व भारतीय भाषांसहित १००+ भाषांमध्ये साहाय्यता देण्याची खात्री देतो.”