‘स्वर पर्व’ मध्ये रंगणार नव्या पिढीच्या आश्वासक कलाकारांची मैफल
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजन
पुणे : शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीच्या आश्वासक कलाकारांचे व्यासपीठ म्हणून उदयास येत असलेल्या ‘स्वर पर्व’ या उपक्रमातील तिसरे पुष्प रविवार, दिनांक १० जुलै सायंकाळी ५ वाजता, मयूर कॉलनी कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या एमइएस सभागृहात सादर होणार आहे. आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत तालानुभूती फाउंडेशन आणि प्राईड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.
कार्यक्रमात पंडित शिवकुमार शर्मा यांच्या परंपरेतील पंडित धनंजय दैठणकर यांचे शिष्य निनाद दैठणकर यांचे संतूरवादन, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सौरभ वर्तक यांचे बासरीवादन व पंडीत अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर यांचे गायन अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळेल. पंडित नयन घोष यांचे सुपुत्र व शिष्य ईशान घोष (तबला), तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित मुजुमदार (तबला), अमेय बिच्छू (हार्मोनियम) व रोहित खवले (पखावज) आदी कलाकारांची साथसंगत असेल
