Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बहुमत चाचणी विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात ; संध्याकाळी 5 वाजता होणार सुनावणी

नवी दिल्ली- राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर आता शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अभिषेक मनु सिंघवी त्यांची बाजू मांडणार आहेत. या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीहून परतल्यानंतर मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील आमदारांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याचे सांगून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देत 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यानंतर शिवसेनेने या फ्लोअर टेस्टला विरोध केला असून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विधानसभेच्या उपाध्यक्षांनी केलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरून बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. या काळात या बंडखोर आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. तसेच विधानसभा उपाध्यक्ष, राज्य सरकार, केंंद्र व पोलिस यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या निर्णयाच्या आधारे शिवसेनेने राज्यपालांनी बोलावलेलं विशेष अधिवेशन अवैध असल्याचं म्हटलं आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात ठाकरे सरकारची बाजू मांडली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या सुटीतील खंडपीठासमोर याचिका सादर करण्यात आली.
सिंघवी- न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, कारण उद्या बहुमत चाचणी आहे आणि आज आम्हाला याबाबत कळवलं आहे.
जस्टिस कांत- तुम्ही जी माहिती सांगत आहात त्यासंबंधीची कागदपत्रे तुम्ही उपलब्ध लवकर करणार का?
कौल म्हणाले की, बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. तो तुम्ही मान्य केला पाहिजे.
न्यायमूर्ती कांत : जोपर्यंत तुम्ही जे म्हणताय त्याची कागदपत्रे आम्हाला देत नाहीत, तोपर्यंत आम्हाला कसे कळणार.
सिंघवी : संध्याकाळपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता होईल याची आम्ही खात्री करू, 6 वाजताही सुनावणी होऊ शकते.. जर ही सुनावणी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर झाली तर निरर्थक ठरेल. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.
न्यायमूर्ती कांत : आम्ही ही केस संध्याकाळी 5 वाजता सुनावणी ठेवू.
सॉलिसिटर जनरल : प्रकरण सुनावणीस घेणे आम्हाला मान्य आहे. तो प्रभुत्वाचा विशेषाधिकार आहे. मी केंद्र सरकारची बाजू मांडत आहे.
सिंघवी : नक्कीच आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करू.
यानंतर सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभु यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना 3 वाजपेर्यंत कोर्टासह सर्व पक्षकारांना याचिकेची प्रत उपलब्ध करून देण्यास सांगितले. यानंतर 5 वाजता सुनावणी होईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading