Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना पत्र; म्हणाले – अजूनही वेळ गेली नाही, या..बसा..बोला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे. ‘मला काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही. समोर या. बसा. आपण निश्चितच काहीतरी मार्ग काढू,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आवाहनाला बंडखोर आमदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंचे पत्र जशास तसे…

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण या..माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading