fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

” निवृत्तीनंतरचा काळ सुखावह व्हावा यासाठी मार्गदर्शन आवश्यक” म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत 

पुणे : भारतीय अर्थव्यवस्था करत असलेल्या दमदार प्रगतीतून  अनेकविध गुंतवणूक संधी निर्माण होत आहेत आणि या संधींचा योग्य मार्गदर्शकांच्या दिशा निर्देशानुसार लाभ घेतल्यास आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकेल आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाचे जाईल एवढी पुंजी जमा होऊ शकेल, असे प्रतिपादन एका गुंतवणूकविषयक चर्चासत्रात तज्ज्ञांनी केले.
पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शिअल अम्बॅसेडर्स असोसिएशन तर्फे आयोजित ‘स्मार्ट मनी २०२२’ या चर्चासत्रात जतिंदर पाल सिंग (चीफ मार्केटिंग ऑफिसर, महिंद्रा मनुलाइफ म्युच्युअल फंड), के आर हरिहरन (सेगमेंट हेड, लर्निंग अँड डेव्हलपमेंट, ऍक्सिस म्युच्युअल फंड ) आणि स्वरूप मोहंती (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मिरे असेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि .) यांनी या चर्चासत्रात सहभागी होत आपली मते मांडली .
  सिंग यांनी “कल आज और कल ” या आपल्या सादरीकरणात भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा गेल्या सहासात शतकांचा आलेख मांडला. “एकेकाळी जागतिक व्यापारात मोठा दबदबा असलेली भारताची अर्थव्यवस्था औद्योगिक क्रांतीनंतरच्या उत्पादन क्षेत्राच्या झंझावातात उडी घेण्यात अपयशी ठरली आणि भारताचे जागतिक व्यापारातील स्थान ढळत गेले. १९४५ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यावर काही देशांनी नेत्रदीपक औद्योगिक प्रगती केली आणि भारताचा क्रम आणखी घसरला. मात्र गेली तीस वर्षे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक उदारीकरणाच्या  प्रक्रियेने आणि खाजगी उद्योगांच्या सहभागाने वेग घेतला असून उत्पादन क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील हिस्सा सुधारत आहे.
 “आत्मनिर्भर भारत” तसेच “उत्पादन निगडित प्रोत्साहन ” सारख्या धोरणात्मक निर्णयांमुळे उत्पादन क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र सातत्याने प्रगती करीत आहेच.” असे सिंग यांनी आकडेवारीच्या आधारे विशद केले.  देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादनातवेगवान वाढ होत असून अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर (एक लाख कोटी ) ने वाढण्यासाठी लागणारा कालावधी कमी कमी होत आहे आणि या वाढीशी सुसंगत वाढ शेअर बाजाराच्या निर्देशांकात होत आहे. या सर्व सकारात्मक प्रक्रियेचा परिणाम म्हणून शिक्षण, रोजगार, क्रयशक्ती या सर्व दिशांनी संधी निर्माण होऊन वस्तू आणि सेवांचा खप वाढेल आणि शेअर बाजारात कमाई करून संपत्ती उभी करण्याचा मार्ग सोपा होईल, असे ते म्हणाले.  “सारथी जरुरी है” या आपल्या निवेदनात श्री हरिहरन यांनी गुंतवणूक प्रक्रियेत मार्गदर्शकाचे महत्त्व स्पष्ट केले. “एखाद्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न आणि गुंतवणूकदाराच्या हाती पडलेले उत्पन्न यातील “वर्तन तफावत” त्यांनी अधोरेखित केली. तोट्याच्या भीतीपायी गुंतवणूक मोकळी केल्यामुळे ही तफावत दिसते. भारतातील यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही परंतु अमेरिकेसारख्या देशातही तिचे प्रमाण प्रतिवर्षी ५ टक्के आहे तेव्हा भारतात ते आणखी मोठे असणार हे नक्की,” असे श्री हरिहरन म्हणाले. नफ्याची घाई आणि तोट्याचा धसका या दोन टोकांमध्ये बहुतांश गुंतवणूकदार भरडले जातात त्यामुळे  गुंतवणूक निर्णय भावनेच्या भरात होतात आणि  अपेक्षित लाभ मिळत नाही किंवा नुकसान वाढते, म्हणून योग्य आणि सक्षम मार्गदर्शक हाच चांगला सारथी ठरतो हे त्यांनी स्पष्ट केले.
दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून आणि मार्गदर्शकावर विश्वास ठेवून गुंतवणूक केल्यास अपेक्षित उत्पन्न निश्चित मिळते असे ते म्हणाले. तरुण वयात योग्य प्रमाणात गुंतवणूक सुरु करणे ही आर्थिकदृष्ट्या सुखावह निवृत्त आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असे मत श्री स्वरूप मोहंती यांनी मांडले. निवृत्तीनंतरच्या गरजा आणि विविध गरजांसाठी सुयोग्य निधी चे योजनाबद्ध  नियोजन महत्त्वाचे आहे, आणि त्यातून निवृत्त आयुष्य आरामात जाऊ शकते असे ते म्हणाले.
भारतात ७५ टक्के लोकांकडे निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी आर्थिक तरतूद कशी करायची याची योजनाच नसते आणि त्यातून अनेकांना अप्रिय धक्क्यांना सामोरे जावे लागते याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की अमेरिका हा ३२ कोटी लोकसंख्येचा देश आहे परंतु तिथे निवृत्तीवेतन निधींमध्ये २२ ट्रिलियन डॉलर ची पुंजी जमा आहे, याउलट भारत हा १३० कोटींचा देश असूनही आपल्याकडे ही पुंजी २३९ अब्ज डॉलर एवढीच आहे. “भारतात १९७० मध्ये सरासरी आयुर्मान ४० वर्षे होते ते आता ७० वर पोचले आहे. याचा अर्थ भारतीय माणूस निवृत्तीनंतर दीर्घकाळ वस्तू आणि सेवांचा वापर करीत राहणार. यासाठी अधिक जबाबदारीने गुंतवणूक नियोजन केले पाहिजे असे ते म्हणाले. लवकर सुरुवात केल्यास निवृत्तीच्या वेळी जमा झालेली रक्कम आपले सर्व खर्च भागूनही वाढत राहते याकडे त्यांनी लक्ष वेधले.” पिफा च्या अध्यक्ष बीना शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि संघटनेची उद्दिष्टे तसेच विविध उपक्रम यांची माहिती दिली. पिफा चे संचालक श्री हर्षवर्धन भुसारी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक भूषण महाजन यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading