भारतातील आर्थिक साक्षरतेची लढाई अजून बरीच मोठी – सुचेता दलाल
पुणे : “ भारतात आजही अनेक आर्थिक घोटाळे सर्रासपणे होत आहेत. आपल्याकडील नियामक मंडळ हे त्याकडे सोयीस्कारपणे दुर्लक्ष करते. त्याचबरोबर आर्थिक फसवणूक प्रकरणी तक्रार निवारण, नुकसान भरपाई याबाबत नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्येही कमालीची उदासीनता दिसून येते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची लढाई अजून बरीच मोठी आहे, असे मत पत्रकार आणि लेखिका सुचेता दलाल यांनी व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशन संस्थेतर्फे हर्षद मेहता पासून केतन पारेख पर्यंतच्या आर्थिक घोटाळ्यांची पोलखोल करणाऱ्या ‘द स्कॅम’ या पत्रकार देबाशिष बसू, सुचेता दलाल लिखित आणि अतुल कहाते, पूनम छत्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी, २४ जून रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे झाले. यावेळी कहाते यांनी पुस्तकाच्या दोन्ही लेखकांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर, रीना पाटकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, सनदी अधिकारी दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक महावीर जोंधळे, डॉ. रविंद्र तांबोळी, लेखिका निलांबरी जोशी, दीपा देशमुख आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, सनदी अधिकारी दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक महावीर जोंधळे, डॉ. रविंद्र तांबोळी, लेखिका निलांबरी जोशी, दीपा देशमुख आदी उपस्थित होते.
दलाल म्हणाल्या, “ आर्थिक घोटाळे, फसवणूकीच्या गुन्ह्यासंदर्भात आपली न्यायव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आजही आर्थिक गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये वर्षोनुवर्षे नागरिकांना न्याय मिळत नाही. इतकेच नव्हे तर सध्याच्या लोकांमध्ये आणि लोकप्रतीनिधीमध्येही वाणिज्य विषयात रस नाही. संसदेत याविषयी कोणतीही चर्चा घडत नाही. प्रश्नांना चुकीची उत्तरे दिली जातात. उत्तम अर्थव्यवस्था बनण्यासाठी आधी आपण वाणिज्य विषयात काम करणे गरजेचे आहे.’’
बसू म्हणाले, “ आपल्याकडे आर्थिक फसवणूकीसाठी ग्राहकाला दोषी मानले जाते. हा एक संघटनात्मक दोष आहे. आर्थिक घडामोडीवर देखरेख करण्यासाठी व्यवस्था आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी यंत्रणा आहे. मात्र असे असतानाही, फ़सवणूकीचा सर्व दोष हा केवळ ग्राहकावर टाकला जातो आणि मग त्याला नुकसान भरपाईसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. हे अत्यंत चुकीचे आहे.’’
पाटकर म्हणाले,” दोन वर्षांपासून या पुस्तकाचे काम सुरू होते. १९९१ साली हर्षद मेहता यांची घोटाळा झाला होता. त्यावेळी मुंबईत होतो. त्याठिकाणी खूप चर्चा ऐकली होती. इतकेच नव्हे, तर हर्षद मेहताला तुरुंगात घेऊन जाताना त्याला पाहण्यासाठी झालेली तुडूंब गर्दी देखील पाहिली होती. आपलेच पैसे खाणाऱ्या माणसाबद्दल लोकांमध्ये असणारे कुतुहुल मी अनुभवले होते. तिथून आज मराठीत या घोटाळयाचे अनुवादित पुस्तक प्रकाशित होत आहे याचा खरोखरच आनंद होत आहे. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात ललित साहित्याचे एकही पुस्तक नाही ही खरोखरच खंत आहे. ललित साहित्याच्या प्रचार व्हावा यासाठी वाचकांनी अधिकाधिक पुस्तक वाचल्यास लेखक आणि प्रकाशक यांनाही ललित साहित्य लेखन आणि विक्रीसाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल.’’
कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुप्रिया चित्राव यांनी केले.
