Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पालखी सोहळ्याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका आणि टँकर पुण्यातून रवाना

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि दोन टँकर पुण्यातून रवाना झाले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून यंदा ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांसह ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ पायमोडे, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, विजय चव्हाण, गजानन धावडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. रुग्णसेवेकरीता रुग्णवाहिकेसोबत डॉ.सुरेश जैन, डॉ.राहुल दवंडे, डॉ.रामेश्वर मुंडे, डॉ.सुमिता चक्रवार, डॉ.दिलीप सातव यांची टिम पुण्यातून रवाना झाली आहे.

डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळा पुणे मुक्काची असताना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, अस्थिरोग, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सुमारे २३७१ वारक-यांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचार घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading