पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २८ जून रोजी सकाळी १० वाजता जेडीबीआयएमएसआर (एमबीए इमारत), एस.एन.डी.टी. महाविद्यालय, महर्षि कर्वे विद्याविहार कर्वेरोड पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी पुणे शहर, भोसरी व पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण २५ उद्योजकांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या ४ हजार ८८३ पदांसाठी सहभाग नोंदविला आहे. ही सर्व रिक्तपदे किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीबीए, एमबीए, वित्त, मार्केटिंग, बॅचलर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स, अन्न प्रक्रिया, बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, पीजीडीएम, पीजीडीएचएम, डिजीटल मार्केटिंग, बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएम आदी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पुरुष व महिला उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी विभागाच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदवावेत. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात.

खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

%d bloggers like this: