Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

धायरीकरांची पाण्यासाठी वणवण सुरूच; पाण्याचे टँकर देखील मिळेनात

पुणे/ सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणी टंचाई सुरु असून नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. त्यात पाण्याचे टँकर देखील उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी पालिकेने या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करून पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

धायरी परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्यामुळे नेहमी धायरीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या धायरी परिसरातील डीएसके विश्व, बेनकर वस्ती, चव्हाण बाग, धायरेश्वर मंदिर, धायरी गावठाण, लायगुडे वस्ती, पोकळे वस्ती, रायकर मळा, जाधव नगर आदी भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात टँकरची संख्या कमी झाल्यामुळे अनेक सोसायटींना टँकर देखील उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

सध्य स्थितीत धायरीला बारंगणी मळा येथील विहरीवरून पाणी पुरवठा होत आहे. पाणी पातळी कमी झाल्यामुळे कॅनॉल मधून पाणी उचलावे लागत आहे. तरी देखील पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या सातत्याने विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

धायरीकरांना पालिकेकडून दरवर्षी मिळतात मोफत टँकरसाठी २० लाख रुपयांचा निधी

धायरी परिसरातील नागरिकांसाठी पालिकेकडून पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षी २० लाख रुपयांचा निधी दिला जात आहे, परंतु या निधीतून नागरिकांना मोफत टँकर मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रत्येक टँकरसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. नागरिकांना पालिकेचा कर भरण्याबरोबर टँकरवर देखील खर्च करावे लागत आहेत त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धायरी परिसरात नागरिकांना किती टँकर मिळतात याची माहिती घेण्यासाठी कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

धायरीच्या पाणीप्रश्नावर आम्ही सात्यत्याने लढा दिला आहे, परंतु पालिका जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत आहे. आज धायरी परिसरातून नागरिकांनी भरलेल्या कर रूपातून पालिकेला करोडो रुपये उत्पन्न मिळत आहे. परंतु पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका उदासीन दिसत आहे. तरी पालिकेने यावर ठोस उपाययोजना न केल्यास धायरी ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

आशा सुनिल बेनकर

माजी सरपंच, धायरी गाव

सध्या धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे, त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिकेतून पाणी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे धायरी परिसराला पाणी पुरविणाऱ्या वाहिकेतून कमी दाबाने पाणी येत आहे. धरणातील पाणी पातळी वाढल्यास पाणी सुरळीत होईल.

व्यंकटेश पाटील
कनिष्ठ अभियंता
पाणी पुरवठा विभाग

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading