fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव यांच्या नृत्यसादरीकरणाने कार्यक्रमाला चारचाँद लावले. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी ‘चित्रपटाची नांदी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता इतरही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. बातमीची वारी, फड लागलाय, वाघ आला, लाथ घालणार, रंग लागला, कडकलक्ष्मी, गरमा गरम घ्या, झुंज लागली, वासुदेव, जाऊ कशी माघारी, जखम जहरी, गंमत गड्या अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हे श्रवणीय संगीत चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहे. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होत आहे. मुख्य म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे पहिल्यांदा ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

‘तमाशा लाईव्ह’चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “हल्ली मराठी चित्रपटांमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग ‘तमाशा लाईव्ह’मध्ये करण्यात आला आहे. पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज देण्यात आला आहे. त्यामुळे हे संगीत तरुणाईलाही भावणारे आहे. या चित्रपटाच्या संगीताची टीम इतकी जबरदस्त आहे. याचा अनुभव गाणी ऐकताना रसिकांना येईलच.”

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading