वारकरी सेवा गौरव पुरस्काराने शेखर मुंदडा यांचा गौरव
पुणे : वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्रतर्फे देण्यात येणारा वारकरी सेवा गौरव पुरस्कार ज्येष्ठ वारकरी सेवक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांना प्रदान करण्यात आला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात श्रीगुरु प्रमोद महाराज जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वरी कंठस्थ एकनाथ महाराज कोष्टी, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी, मंदिर संस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. वारकरी संप्रदायात या पुरस्काराला विशेष महत्व आहे.
वारकरी संप्रदायांच्या साधक तथा प्रबोधकांची कोविड काळात केलेली विशेष सेवा, वारी कालावधीत वारकरी सेवा रथ माध्यमातून केलेली हजारो वारकरी बांधवांची सेवा, पंढरपूर येथील चंद्रभागामाता मंदिर जीर्णोद्धार कार्य, देहू येथे आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील लाखोंची वृक्षलागवड व संवर्धन असे उपक्रम राबविल्याबद्दल शेखर मुंदडा यांना वारकरीसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शेखर मुंदडा म्हणाले, अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा ‘वारकरीसेवा पुरस्कार’ मला मिळाला आहे. हा पुरस्कार माझे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, माझे मार्गदर्शक चंद्रकांत राठी व महाएनजीओ फेडरेशनचे सर्व सहकारी यांना आदरपूर्वक समर्पित करतो. या पुरस्काराने माझ्यावर कार्याची अधिक जबाबदारी देखील वाढली आहे. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण सुवर्णक्षण म्हणजे श्री माऊलींच्या दरबारात मला सन्मानित करण्यात आले.
वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले, कार्याध्यक्ष शशिकांत काटे व समस्त राज्य कार्यकारिणी तसेच ज्येष्ठ कीर्तनकार चंद्रकांत महाराज वांजळे, प्रमोद महाराज पवार, बजरंग महाराज आंधळे, विश्वास कळमकर आदी मान्यवर तथा महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, संचालिका विद्या काबरा व उद्योजक योगेश बजाज देखील उपस्थित होते.
