ज्युनिअर राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेत पुण्याच्या प्रणव पाटील याला ब्रॉंझ पदक आणि साहील खेडेकर चतुर्थ क्रमांकावर
पुणे : ३९ वी राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी चतुर्थ क्रमांक संपादन करून मेरीट मध्ये स्थान मिळवले मुलांच्या संघाने प्रथमच सेमी फायनल मध्ये प्रवेश केला.तसेच वैयक्तिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रणव पाटील व मयूर पाटील या जोडीने दुहेरी मध्ये,व ओंकार धावडे व शिवकांची काकडे या जोडीने मिश्र दुहेरी मध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला.
वैयक्तिक एकेरी स्पर्धेत मात्र पुण्याच्या प्रणव पाटील याने तृतीय स्थान पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. उपउपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या वि. राजू याचा २१-१५ व २१-१४असा सरळ पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्य फेरीत मात्र तामिळनाडूच्या सुखी वर्गमन यांच्याकडून २१-१९ ,१८-२१,२२-२०असा चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पुण्याचाच दुसरा खेळाडू साहील खेडेकर याने उपाउपांत्यफेरीत आंध्र प्रदेशच्या एम. यश यांचा २१-१६,२५-१९ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत मात्र तामिळनाडूच्याच एस. कार्तिकराजा कडून १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करला.तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत प्रणव पाटील याने साहिल खेडेकर २१-१७,२१-१६ असा पराभव करून ब्रॉंझ पदक पटकावले.
टेनिक्वाईटच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राचे दोन खेळाडू पहील्या चारमध्ये पोहोचले आहेत.महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन तर्फे या खेळाडूंचा सत्कार समारंभ अशोक विद्यालय, टिळक रोड येथे महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष मा. आ.मोहन जोशी व अशोक विद्यालयाचे संचालक श्री. प्रथमेश आबनावे यांच्या हस्ते करण्यात आला. मा आ. मोहन जोशी यांनी यापुढे या खेळाडूंकडे प्रत्यक्ष लक्ष देऊन त्यांना सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.जेणेकरून महाराष्ट्राचा संघ प्रथम क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत वेदपाठक यांनी केले तर प्रास्ताविक अनिल वरपे यांनी केले.आभारप्रदर्शन माधुरी गानू यांनी केले.
