महागाईचा उच्चांक असताना हमीभावात झालेली वाढ ही उणेच – रंगा राचुरे
पुणे : परवा केंद्र सरकारने नवीन हमीभाव जाहीर केले आहेत. हे हमीभाव काढताना, खर्च अधिक ५० टक्के नफा, असे गणित तत्वतः मान्य केले गेले आहे तरीही प्रत्यक्षात शेतकरी हा अधिकधिक निर्धन होण्याच्या दिशेने वाटचाल करतो हे वास्तवात दिसते आहे. स्वामिनाथन यांनी कुठल्याही सर्वसामान्य नागरिकास मिळणाऱ्या ‘टेक होम’ उत्पन्नाएवढे शेतकऱ्याचे किमान उत्पन असलेच पाहिजे असे आग्रही प्रतीपादन केले होते.
या वर्षी हमीभावात साधारणपणे साडेचार ते साडेआठ टक्के वाढ केली गेली आहे . मजुरी दरात ३५ ते ६५ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी बियाणांचे भाव वाढले आहेत. महाबीजने सोयाबीन दरात ४० टक्के वाढ केली आहे आणि इंधनाचे भावही वाढले आहेत. या सर्वाचे प्रतिबिंब महागाई निर्देशांकात दिसते. तो ७.८ टक्केच्या जवळपास आहे. असे असताना खरे तर ज्या पिक हमिभावात महागाई निर्देशांकापेक्षा कमी वाढ झाली आहे म्हणजेच त्यात एका अर्थी ‘उणे वाढ’ केली आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया आप चे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.
शेती व्यवसायाचा उत्पादन खर्च वाढला आहे.हमीभाव ठरवताना सी- २ फोर्मुला वापरला जावा असे अपेक्षित आहे परंतु ‘ए २ अधिक एफ एल ‘चा वापर केला आहे. जो हमीभाव दिला आहे तो मिळेल याची शाश्वती नाही . त्यामुळे सर्वच ठिकाणी कर्जमाफी चे आश्वासन सरकारांना द्यावे लागते. मागील वर्षी शेतकर्यांच्या आंदोलनादरम्यान ‘कायदेशीर हमीभावा’ची मागणी केली जात होती. त्या मागणीबाबत सरकार गंभीर नाही हेच यातून उघड होते आहे.
