कोणतेही संशोधन समाजाच्या विकासासाठी झाले पाहिजे – डॉ. अजित रानडे
पुणे: सर्व प्रकारच्या शास्त्रांचा एकत्रित विचार करून त्यावर संशोधन केल्यास त्याचा समाजाच्या विकासासाठी उपयोग होईल, मात्र इतिहास जाणून न घेता केलेले संशोधन अपूर्ण राहील, असे प्रतिपादन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी आज येथे केले.
संशोधन ज्ञान विचार प्रतिष्ठानच्या डॉ. श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सतर्फे “सोशल सायन्स जर्नल” या त्रैमासिकाचा शुभारंभ डॉ. रानडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा एकत्रित विचार केल्यास समाजशास्त्र विकसित होते. आज विज्ञानाची ताकद आहेच, त्याचे संशोधन समाजाच्या विकासासाठी झाले पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यावेळी म्हणाले की, आज वैचारिक विस्तारवादाची गरज आहे. भारताने जगाला खूप काही दिले आहे, ज्याची व्याप्ती मोठी आहे. त्यावरही प्रबंध सादर केले गेले पाहिजेत.
यावेळी आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जीएमके ग्लोबल कंपनीच्या कपिश्र्वर जोशी व योगेश जोशी यांनी प्रतिष्ठानला रुपये एक कोटींची देणगी जाहीर केली.
या कार्यक्रमाला बिशप थॉमस डाबरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तत्वे आणि भूमिका ख्रिश्चन समाजाला मान्य आणि स्विकाहार्य आहे. संघ आणि ख्रिश्चन समाजात संवाद, समन्वय होण्याची गरज आहे, त्यातून दोन्ही बाजूने असलेले गैरसमज दूर होतील. संघाची राष्ट्रवादाची भूमिका आहे, तीच ख्रिश्चन समाजाची देखील आहे.
संशोधन ज्ञान विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ देवधर, नितीन देशपांडे, माजी खासदार प्रदीप रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पत्रिकेचे संपादक डॉ. शरद खरे यांनी स्वागत केले तर सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नितीन देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
