‘जगायचं तर निसर्ग समजून घ्या’ – श्री. द. महाजन
पुणे : ‘माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर निसर्ग समजून घ्यायला हवा.’ असे प्रतिपादन वनस्पती वर्गीकरणतज्ज्ञ श्री. द. महाजन यांनी केले. निमित्त होते वैशाली व्यवहारे-देशपांडे संपादित सुनीधि प्रकाशन प्रकाशित ‘आपुलाचि संवाद आपणाशि’ या पुस्तकाचे प्रकाशनाचे. याप्रसंगी भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन मंत्री मुकुल कानिटकर, हवामान अभ्यासक डॉ. रंजन केळकर, स्वामी स्वरूप स्वानंद, पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी, माध्यम व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. केशव साठये, सुनिधी पब्लिशर्सचे अविनाश काळे, वैशाली व्यवहारे-देशपांडे उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना महाजन म्हणाले, ‘निसर्गाशी संवाद महत्त्वाचा आहे. झाडा-फुलांशीही संवाद होऊ शकतो. प्रत्येकालाच निसर्गाच्या जवळ जाता आले पाहिजे.’
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुकुल कानिटकर यांनी ‘आधुनिक शिक्षणा’चा मुद्दा अधोरेखित करत ‘स्व-शोध’ घेणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.
याप्रसंगी वैशाली व्यवहारे-देशपांडे यांच्या ‘सखा आत्मसंवाद’ पुस्तकाच्या ऑडिओ बुकचेही प्रकाशन महाजन यांनी केले. गिरीश रांगणेकर, तन्मय कानिटकर, चेतन जोशी हे पुस्तकातील लेखक उपस्थित होते. ध्रुव देशपांडे यांनी तांत्रिक साह्य केले तर सूत्रसंचालन विवेक कवठेकर यांनी केले.
