fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरावर उभारली १५ फूट शिवस्वराज्यगुढी

पुणे : शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह १५ फुटी शिवशक राजदंड शिवस्वराज्यगुढी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरावर उभारण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वयंस्फूर्तीने ट्रस्टने मंदिराच्या प्रवेशद्वारात शिवस्वराज्यगुढी उभारुन पूजन केले.

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिन स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यात आला. ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु आहे. ट्रस्टच्या उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे यांच्या हस्ते गुढीचे पूजन झाले. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त राजू बलकवडे, शिवप्रेमी सागर पवार, मंदिराचे व्यवस्थापक विजय पाचंगे उपस्थित होते.

अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी जसा रयतेसाठी राज्यकारभार केला, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनी दरवर्षी दत्तमंदिर ट्रस्ट गुढी उभारते. यावर्षी गणेशोत्सव मंडळांनी देखील शिवस्वराज्यगुढी उभारली. पुण्यात १०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गुढीपूजन झाले. यामुळे शिवरायांचा विचार तळागाळात पोहोचविण्यात मदत होणार आहे.

वैभव निलाखे, ऋषिकेश अभंग, उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, प्रभावती नांगरे, शोभा गादेकर यांनी शिवस्वराज्य गुढी उभारण्याचे नियोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading