Wednesday, June 3, 2026
BusinessLatest NewsPUNE

विश्वेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष सोहळा संपन्न

पुणे :  विश्वेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित काशी येथील जंगमवाडी मठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा आशीर्वचन व सत्कार समारंभ आज रोजी  बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांच्या हस्ते महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी ह.भ.प. गुरुबाबा औसेकर महाराज, तेलंगणा राज्यातील जहिराबादचे  खासदार भीमराव पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, विश्वेश्वर बँकेचे संचालक आणि सुवर्ण महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुनील रुकारी, उपाध्यक्ष मनोज साखरे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे उपस्थित होते. यावेळी खासदार पाटील यांच्या हस्ते आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षित अशा बँकेच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महास्वामीजींच्या हस्ते बँकेच्या आजी- माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कथक नृत्याच्या माध्यमातून गणेशवंदना सादर करण्यात आली.

यावेळी विद्याधर अनास्कर म्हणाले,” आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात श्रद्धा म्हणजे काय? असा प्रश्न अंनेक जण उपस्थित करत असतात. अनेकांना श्रद्धा म्हणजे बुद्धी गहाण ठेवणे असे वाटत असते. आजकाल श्रद्धेला  राजकारणाचा  विषयदेखील  बनविला जात आहे. मात्र श्रद्धा ही ताकद आहे.  विश्वेश्वर शिवाचार्य यांच्याप्रती बँकेच्या संचालक मंडळाची असलेल्या श्रदधेचे सामुदायिक शक्तीत झालेले रूपांतर  हे  बँकेच्या यशस्वी वाटचालीत महत्वपूर्ण ठरते. संपूर्ण सहकार क्षेत्राला ही भावना मार्गदर्शक ठरू शकते.’’

महास्वामीजी म्हणाले,” भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले जातात. मात्र धर्म, काम आणि मोक्ष हे तिन्ही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी अर्थाची आवश्यकता असते. अर्थ सर्वांना पाहिजे आणि तो निरंतर वाढत राहावे हीदेखील इच्छा असते. मात्र त्यासाठी सदाचार आणि सद्विचारांची गरज असते. धन संपादन करताना जो शुभाचे म्हणजेच चांगल्या गोष्टींचे विचार करतो त्याच्याच घरी महालक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळेच प्रत्येक नागरिकाने सद्विचार आणि चांगल्या मार्गानेच अर्थाजन केले पाहिजे.’’

अनिल गाडवे म्हणाले,”  नोव्हेंबर १९७२ साली स्थापन झालेल्या विश्र्वेवर सहकारी बँकेचा व्यवसाय आज २५५० कोटींहून अधिक असून, एनपीए हा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बँकेच्या कामगिरीचा आलेख हा सतत चढता राहिला आहे. बँकेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये २८ शाखा आणि २२ एटीएम कार्यरत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने १४ कोटींहून अधिकचा नफा मिळविला असून, मल्टी स्टेटचा दर्जा मिळविल्यानंतर आता शेड्युल बँकेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नजीकच्या काळात शाखा विस्तारावर भर देण्यात येईल. “

यावेळी भीमराव पाटील आणि ह.भ.प. गुरूबाबा औसेकर यांचे भाषणं झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील धनगर यांनी केले. सुनील रूकारी यांनी प्रास्ताविक केले, तर मनोज साखरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading