मराठी मातीतील चित्रपट करण्याची गरज – चिन्मय मांडलेकर
पुणे : मुंबई, ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या पलिकडे राज्यात मराठी चित्रपटांची मार्केट क्षमता कमी आहे. कोकणात थिएटर कमी आहेत. तर विदर्भात हिंदीचा पगडा आहे. मराठी चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरही विशेष स्थान नाही. त्यामुळे चित्रपटासाठीचे बजेट महत्त्वाचे ठरते. कोविडनंतर परिस्थिती आणखी बदलली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टी झगडत आहे. मराठी चित्रपट सृष्टी म्हणून पुढे जाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मराठी मातीतील चित्रपट करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेता-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीर्इएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘बीव्होक इन फिल्म मेकिंग आणि ड्रामाटिक्स’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शिवराय अष्टक आणि काश्मिर फार्इल्स’च्या निमित्ताने ‘चित्रपट सृष्टीची नवी आव्हाने’ या विषयावरील गप्पाष्टकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मांडलेकर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर आणि दिप्पाल लांजेकर सहभागी झाले होते. शंतनु जोशी आणि योगेश सप्रे या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
मांडलेकर पुढे म्हणाले, ‘नाटक कल्पनेवर सोडता येते. आभास निर्माण करावा लागतो. नाटकात अभिनय महत्त्वाचा असतो. चित्रपटात खरे असणे आवश्यक असते. हे बेसिक कळाले की चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही प्रकारात काम करणे सोपे जाते. कादंबरीचे चित्रपटात रुपांतर करीत असताना कादंबरीपेक्षा चित्रपटाशी प्रामाणिक राहाणे आवश्यक असते. नाही तर चित्रपट गंडण्याची शक्यता असते.
माहिती असणे आणि अभ्यास करणे असे दोन प्रकार आहेत. सखोल अभ्यास केला पाहिजे. अभिनय आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी सखोल वाचनाची गरज आहे. लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन एकच व्यक्ती करत असताना त्याचे वेगवेगळे विभाग करणे आवश्यक असते. मला प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळे शिकता येते. जे जे वाचता, पाहाता येर्इल ते ते टिपले पाहिजे. वैयक्तिक आणि पडद्यावरील भूमिकेत फरक ठेवला पाहिजे. असे मत मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अजय पूरकर म्हणाले, सातत्याने नवीन काही तरी करायला पाहिजे. ज्या दिवशी कलेचा कंटाळा येतो तेव्हा ती संपते. कलेचा ध्यास असावा. कलेच्या बाबतीत कलाकार नेहमी असमाधानी असावा. चांगला कान असेल तर आवाजातून व्यक्त होताना केव्हा कुठल्या पट्टीत बोलायचे ते कळते. ऐतिहासिक पात्र साकारणे दुधारी तलवार आहे. तो आभास निर्माण करावा लागतो. ही पात्र साकारताना त्यांच्यातील मपणसाचा शोध घेणे महत्त्वाचे असते. ते लोकांना जास्त भावते. त्यासाठी कलाकाराने प्रामाणिक राहावे लागते.
दिप्पाल लांजेकर म्हणाले, मालिका एकाग्रतेने पाहता येत नाहीत. चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढला जातो. तो एकाग्रतेने पाहाता येतो. म्हणून शिवराय अष्टकासाठी चित्रपट माध्यम म्हणून निवडले. शिवाजी महाराजांच्या मागील अथांग सागराचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रंथ आणि कागदपत्रांच्या माध्यमातून करतोय. ते काय सकारात्मक करत होते त्याचा शोध घेतोय, प्रत्येक मराठी माणसात शिवाजी महाराजांचे रूप असते, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय.
प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी स्वागत, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणीक यांनी प्रास्ताविक, अनन्या पेंडसे व रुपाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन, माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी परिचय आणि प्रा. रुपाली देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. डीर्इएसचे बी. व्होक. समन्वयक प्रशांत गोखले यांची उपस्थिती होती.
