PMPML सेवेतील हंगामी- बदली- रोजंदारी सेवकांना नियमानुसार कायम करा, कोविड काळातील त्यांचे थकीत वेतन द्या -आप
पुणे:पीएमपीएमएल सेवेत २२०० हंगामी, बदली, रोजंदारी सेवक काम करत आहेत. बारा महिन्यांमध्ये अखंडितपणे २४० दिवस काम करणाऱ्या बदली कामगारांना, हंगामी कामगारांना कायम करून त्यांना सेवेमध्ये समावेश करून घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. याबाबत वारंवार अनेक कोर्टाचे निर्णय देखील आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटीशन नंबर ३७२/१९९७ चा निकालांमध्ये याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. वरील अट पूर्ण करणारी परिस्थिती असताना आणि शेड्युल मान्य रिक्त जागा असताना सदर बदली कामगारांना, हंगामी कामगारांना सेवेमध्ये कायम करून घेण्यात यावे असे आदेश माननीय उच्च न्यायालयाने पुणे पब्लिक ट्रान्सपोर्ट संबंधीच्या केसमध्ये दिलेले आहेत.
पी एम पी एम एल मध्ये शेकडो बदली ड्रायव्हर, बदली कंडक्टर व बदली क्लिनर म्हणून वर्ष २०१७ पासून काम करत आहेत. दिनांक २९/१२/२०१६ रोजी पी एम पी एम एल ने बदली ड्रायव्हर, बदली कंडक्टर व बदली क्लिनर पदाच्या दिलेल्या जाहिरातीमध्ये “उमेदवारांची नियुक्ती बदली पदांवर करण्यात येणार असल्याने सदर पदांसाठी शेड्युल मान्य जागा मंजूर झाल्यानंतरच त्यांना किमान दोन वर्षे बदली पदावर काम केल्यानंतर सेवेत कायम करण्याबाबत” शर्तीचा उल्लेख केला होता. या पीएमपीएमएलच्या शर्तीचे पालन पीएमपीएमएल प्रशासनाने करावे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे श्री विकास काशिनाथ राठोड यांचेकडील केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार अर्ज आवक क्रमांक २७१३ दिनांक ७/७/२०२१ नुसार मागवलेल्या माहितीला उत्तर देताना पी एम पी एम एल प्रशासनाने सांगितले की, माहे जून २०२१ अखेर महामंडळामध्ये ड्रायव्हर पदाचे १५८४ शेड्युल मान्य जागा रिक्त आहेत आणि सध्या ११८० इतके बदली ड्रायव्हर कार्यरत आहेत तसेच माहे जून २०२१ अखेर महामंडळामध्ये कंडक्टर पदाचे १३५४ शेड्युल मान्य जागा रिक्त आहेत आणि सध्या ५७५ इतके बदली कंडक्टर कार्यरत आहेत.
याचा अर्थ असा की शेड्युल मान्य ड्रायव्हर व शेड्युल मान्य कंडक्टर रिक्त पदांची संख्या बदली ड्रायव्हर व बदली कंडक्टर यांच्या संख्यापेक्षा खूप जास्त आहे. तरी कायद्यानुसार आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ महिन्यांच्या कालावधीत२४० दिवस अखंडपणे सेवा देणाऱ्या बदली, हंगामी, रोजंदारी सेवकांना पी एम पी एम एल च्या सेवेमध्ये नियमानुसार नियमित करून घेण्यात यावे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.
