आरोग्यशास्त्र विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १७ मे रोजी झाले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर, राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.डॉ.एन.एस.उमराणी व कुलसचिव प्रा.डॉ. प्रफुल्ल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वसामान्य व्यक्तीचे जीवनमान उंचावणारे व स्वास्थ्यसंवर्धन करणारे शिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. पारंपारिक व आधुनिक वैद्यक प्रणाली एकत्र येऊन समाज स्व्यास्थ्याकरीता समन्वय साधावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
आरोग्यशास्त्र विभागाच्या संचलिका डॉ. आरती नगरकर यांनी विभागाच्या गेल्या ३० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण संशोधन यामुळे सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य हा सध्याच्या काळात महत्वाचा विषय असून त्याकरीता विभाग कार्यरत असल्याचे सांगून प्रा. करमळकर यांनी स्वास्थ्य संशोधनाकरीता विभागास शुभेच्छा दिल्या. विभागाचे आंतरशाखीय संशोधनातील योगदान प्रा. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. विभागाचा थोडक्यात इतिहासही त्यांनी संगितला. प्रा. पा. वा. सुखात्मे यांच्या प्रयत्नातून विद्यापीठातील एका छोट्या खोलीतून सुरू झालेल्या या विभागाने जागतिकस्तरावर आपले स्थान निर्माण केली आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाकरिता विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासनातील कर्मचारी, तसेच विविध क्षेत्रातील संशोधक उपस्थित होते.
आरोग्यशास्त्र विभागाच्या विस्तारीत इमारतीमध्ये आयुष प्रयोगशाळा, आहारशास्त्र प्रयोगशाळा, संगणक केंद्र, व विद्यार्थ्यांकरीता अत्याधुनिक वर्ग या व्यवस्था असून त्यांचा उपयोग विभागातील शैक्षणिक व संशोधन प्रकल्पात होणार आहे.
