स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन; राष्ट्रवादीच्या च्या 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : जे डब्ल्यू मॅरियट बाहेर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल स्मृती इराणी पुण्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन केले होते. तसेच बालगंर्धव सभागृहात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाणही झाली होती. आज सकाळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मारहाणप्रकरणी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर
गुन्हे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे त्यांच्यावर सुद्धा कार्यकर्त्यां प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी स्मृती इराणी या हॉटेल जे डब्ल्यू मॅरियट मध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. या वेळी महागाई विरोधात आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र जमले होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जेडब्ल्यू मॅरेज हॉटेल मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी याठिकाणी मोठी तारांबळ उडाली होती. त्यानंतर अथक प्रयत्नाने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर आज या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
