fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अहिल्या आश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य उभारले. रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांचा पुढाकार अतिशय महत्वाचा राहिला होता.

बीएचे शिक्षण घेऊन शेवाळे यांनी लष्करात काही काळ काम केले. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत काम सुरु केले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई यांच्यासह रिपब्लिकन चळवळीच्या कार्याला सुरुवात केली. पुढे ते रामदास आठवले यांच्याबरोबर जोडले गेले. गेली ३० वर्षे ते आठवले यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर कार्यरत होते.

ज्या अहिल्या आश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वावर राहिला, तिथे शेवाळे अखेरपर्यंत कार्यरत होते. अनेकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याची, ऐकण्याची संधी त्यांना मिळाली होती. राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र, अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी पक्ष संघटनेच्या मजबुतीवर लक्ष दिले. चळवळीत हजारो कार्यकर्ते घडविण्याचे काम त्यांनी केले. रिपब्लिकन ऐक्य व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले. १९९१ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील घराची पुनर्बांधणी करण्यात त्यांची मोलाची भूमिका बजावली.

चळवळींना सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी विविध विषयांवर त्यांनी सातत्याने वृत्तपत्रांतून विपुल लेखन केले. विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्य उभारले. त्यांच्या या कार्याचा गौरव राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने, तसेच दलितमित्र पुरस्काराने झाला आहे. इतर अनेक संस्थांनी त्यांना मनाचे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.

शेवाळे यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी (दि. १७) सकाळी ११ च्या सुमारास धोबी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, नाना पेठेतील अहिल्या आश्रमाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून धोबीघाटापर्यंत अंत्ययात्रा निघणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading