Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट

‘बुद्धासोबत क्षणोक्षणी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन

पुणे : “मानवाच्या मनात सुरू असलेली विचारांची प्रक्रिया, त्याचा दृष्टिकोन, आठवणी, भाषा, समस्यांचे निराकरण करण्याची त्याची क्षमता अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणारे भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट अर्थात संज्ञानात्मक मानसशास्त्रज्ञ होते,” असे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले. मनोविकास प्रकाशन, पुणे वेध आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजी, पुणे यांच्यावतीने बुद्धपौर्णिमेनिमित्त मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘बुद्धासोबत क्षणोक्षणी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले.

चर्चासत्रात मनोविकार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे बोलत होते. डॉ. ज्योती शिरोडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच यावेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, पुणे वेधचे दीपक पळशीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर, लेखिका दीपा देशमुख उपस्थित होते.

यावेळी डॉ. बहुलकर म्हणाले, “तत्वज्ञानांन सुचविलेला कोणताही जीवनमार्ग भगवान बुद्धांना पटला नाही. टोकाची मौजमजा आणि टोकाचा आत्मक्लेश हे दोन्ही मार्ग सोडून मध्यम मार्ग स्वीकारला. जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय होत नाही, तर कर्माने होते. त्यामुळे आपण कर्माने श्रेष्ठ झाले पाहिजे हे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचे वेगळेपण आहे.”

डॉ. बर्वे म्हणाले, “बुद्धाने आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा ‘व्हिजन’ दिले, समजूतदारपणा दिला. द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला. जगाकडे स्वच्छ नजरेने बघणे हेच त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानातून सांगितले.” याप्रसंगी डॉ. नाडकर्णी यांनी भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानावरील त्यांनी लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading