छत्रपती संभाजीराजे यांनी केल्या दोन मोठ्या घोषणा
राज्यसभा अपक्ष लढणार, संघटनेची स्थापना
पुणे : छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दोन घोषणा केल्या. यातील पहिली घोषणा ही राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील केली. संभाजीराजे म्हणाले ,आपण येणारी असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्याला सगळ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात 29 अपक्ष आमदार असून आपण त्यांची पाठिंब्यासाठी वैयक्तिक भेट घेणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. भाजपच्या शिफारशीवरून राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभा खासदार झाले होते. त्यांच्या खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत बरीच उत्सुकता होती. ते वेगळा पक्ष काढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
छत्रपती संभाजीराजे यांनी पक्षाची घोषणा न करता स्वराज्य नावाची संघटना स्थापन करत असल्याचे जाहीर केले. संघटनेचे चिन्ह किंवा रंग काय असेल असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की याबाबत अजून काही ठरलेले नाही. यापुढे महाराष्ट्राचा जो दौरा होईल त्यामध्ये लोकांकडूनच आम्हाला चिन्ह काय असावे किंवा रंग काय असावा याबाबतची मते कळू शकतील. मात्र असं असलं तरी रक्तातील आणि हृदयातील केशरी पट्टा कोणी काढू शकत नाही असे छत्रपती संभाजीराजेंनी आवर्जून सांगितलं.
गेल्या महिन्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. मतदानानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, खासदारकीची मुदत संपल्यानंतर आपली वेगळी दिशा असेल. तोपर्यंत ‘वेट ऍण्ड वॉच’ अशी आपली भूमिका राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. दरम्यान, बराच विचार करून आज मतदान केले. त्यासाठी आपल्याला 30 सेकंदांचा वेळ लागल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘सर्वसामान्य, गरिबांसाठी आपला नेहमी संघर्ष सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आपण उपोषण केले. सामाजिक क्षेत्रातसुद्धा आपले प्रामाणिकपणे काम सुरू आहे. त्यावर कोणी काय बोलावे, कोणती भूमिका घ्यावी, यावर आपल्याला काही भाष्य करायचे नाही,’ असेही ते म्हणाले.
संभाजीराजे म्हणाले,२०१७ पासून महाराष्ट्र फिरलो. विद्याथ्याचे, कामगारांचे, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न समजून घेतले. शाहूंच्या विचारांप्रमाणेच आजपर्यंत वाटचाल केली आहे. सत्ता असेल तर आपलेला बदल घडवता येतो. ६ वर्षात राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून सेवा देत आलो.
