Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मिले सूर मेरा तुम्हाराने असंख्य भारतीयांना पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले – अमित देशमुख

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन

पुणे : “भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा आणि माझा समक्ष परिचय झाला नसला तरीही मिले सूर मेरा तुम्हाराच्या माध्यमातून ते असंख्य भारतीयांशी जोडले गेले त्या भारतीयांपैकीच मी एक.  आज पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी बोलताना मला माझे वडील आदरणीय विलासराव देशमुख यांचीही आठवण येतेय. कारण त्यांच्याकडून पं. भीमसेन जोशींच्या मैफलींविषयी आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सवाविषयी लहानपणी खूप काही ऐकले आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला विलासराव आवर्जून जात असत. आज या महोत्सवाच्या निमित्ताने माझे वडील विलासराव आणि पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे,” अशी भावना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा’च्या उदघाटना वेळी ते बोलत होते.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, भारतरत्न पं  भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य पं. श्रीनिवास जोशी, पं. प्रमोद गायकवाड, पं. शारंगधर साठे, शास्रीय गायिका सानिया पाटणकर आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि दर्जाचा एक मोठा शास्रीय संगीताचा महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईत आयोजित करता येईल का याविषयी मी पं. श्रीनिवास जोशी यांच्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत शास्रीय संगीतातील कलाकारांना शासनाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठीही आम्ही पुढाकार घेत आहोत. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या शास्रीय संगीताचा ठेवा जपण्यासाठी संगीत विद्यापीठ सुरू करण्याविषयी शासन विचार करीत आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात पं. शंकररावजी गायकवाड यांचे नातू पं. प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन आणि पं. मनोहर चिमोटे यांचे शिष्य पं. शारंगधर साठे यांच्या संवादिनी वादनाने झाली. सुरुवातीला त्यांनी राग मारुबिहाग सादर केला. यानंतर त्यांनी राग दादरा, मिश्र खमाज सादर केला. त्यांना तबला साथ पं. अरविंद कुमार आझाद यांनी दिली.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व पुत्र पं. श्रीनिवास जोशी यांनी राग बिहागमधील रचना सादर केल्या. त्यानंतर आता कोठे धावे मन हा अभंग सादर केला. त्यांना तबला साथ पांडुरंग पवार यांनी दिली तर संवादिनी साथ अविनाश दिघे यांनी दिली. भारतरत्न पं. भीमसेन यांच्या जीवनापटावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन नेहा परांजपे यांनी केली.

उद्या (१० मे) महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विलायत खानी घराण्याचे  पं. मारुती पाटील यांचे सतारवादन होईल. त्यानंतर कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे कथक नृत्य सादर करतील. किराणा घराण्याचे गायक आणि पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading