मुलींच्या गटात पुणे व पालघर विजेतेपदासाठी भिडणार
राज्य कबड्डी स्पर्धा : मुलींच्या गटातून सांगली, मुंबई शहर संघ स्पर्धेबाहेर
पुणे : मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत पुणे व पालघर संघांनी आपपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने युवानेते पार्थ पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या मुलींच्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
मेट्रो मैदान, साई चौक, बालेवाडी येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील मुलींच्या गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत पालघर संघाने सांगली संघाला ३८-३४ असे पराभूत करतना अंतिम फेरीत प्रवेश केला. पालघर संघाने मध्यंतराला २०-१४ अशी ६ गुणाची महत्वपूर्ण आघाडी घेतली. विजयी ऐश्वर्या पाटीलने चढाईत तर हर्षा शेट्टीने चढाई व पकडी अशा दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून अनुजा शिंदे व शिवरांजणी पाटील यांनी चढाया तर श्रद्धा माळीने सुरेख पकडी केल्या, परंतू त्या संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरल्या.
मुलींच्या गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने मुंबई शहर संघाला ४१-२८ असे असे १३ गुणांनी पराभूत करतना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुणे संघाने मध्यंतराला २०-१५ अशी ५ गुणांची आघाडी मिळविली होती. विजयी पुणे संघाकडून समृद्धी कोळेकर व मनीषा राठोड यांनी चढाई करताना साक्षी गावडे व श्रुतिका व्यवहारे यांनी पकडी करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला. पराभूत संघाकडून साक्षी सावंतने दमदार खेळाचे प्रदर्शन केले.
तत्पूर्वी, मुलींच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पुणे संघाने मुंबई उपनगर संघाला ३६-३४ असे २ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबई उपनगर संघाने मध्यंतराला २०-१९ अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर पुणे संघाकडून समृद्धी कोळेकर, कर्णधार अनुष्का फुगे व श्रुतिका व्यवहारे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करताना संघाला विजय मिळवून दिला. यशदा पुजारी व सुभद्रा खोत यांनी मुंबई उपनगर संघाकडून दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये मुंबई शहर संघाने औरंगाबाद संघाला ३२-२९ असे तीन गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला मुंबई शहर संघाने २१-१७ अशी आघाडी घेतली. साक्षी सावंत व भारती यादव यांनी चढाई करताना तर प्राची भादवणकरने पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. औरंगाबाद संघाकडून कोमल ससाणे व तृप्ती अंधारे व ऋतुजा पाठक यांनी सुरेख खेळ केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या लढतीमध्ये पालघर संघाने रायगड संघाला २७-१७ असे १० गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला पालघर संघाने १४-११ अशी आघाडी घेतली होती. चौथ्या लढतीत सांगली संघाने ठाणे संघाला ४०-२२ असे १८ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला सांगली संघाने १९-१३ अशी आघाडी घेतली होती.
मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये मुंबई उपनगर संघाने अहमदनगर संघावर ३७-३४ अशी ३ गुणांनी मात करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाने १९-१५ अशी आघाडी घेतली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये कोल्हापूर संघाने रायगड संघावर ३३-२१ अशी १२ गुणांनी मात केली. मध्यंतराला दोन्ही संघांनी १३-१३ अशा समान गुणांची कमाई केली. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये पालघर संघाने रत्नागिरी संघावर ४१-३३ असे ८ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला पालघर संघाने १८-१३ अशी ५ गुणाची आघाडी घेतली होती. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये परभणी संघाने सांगली संघावर ३१-२५ अशी ६ गुणांनी मात केली. मध्यंतराला परभणी संघाने १४-१३ अशी एका गुणाची आघाडी घेतली.
