Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

‘मुहूर्ते जीबना ‘ तून कोरोना काळातील प्रत्ययकारी जीवन दर्शन !

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तारीझम ‘-मुंबई प्रस्तुत ‘मुहूर्ते जीबना ‘ या ओडिसी नृत्यनाटिकेला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना साथीत कोलमडलेल्या आणि साथीनंतर सावरलेल्या मानवजातीचे जीवनदर्शन या विलोभनीय नृत्यनाटिकेतून समोर आले ..त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ! बेसावध मानवजातीला कोरोनाने खिंडीत गाठल्यानंतर स्वतःला,सर्वांना सावरणाऱ्या,हानीनंतर नव्या जोमाने उभे राहणाऱ्या प्रेरणेचे दर्शन या नृत्यनाटिकेतून घडले आणि उपस्थित रसिक भारावून गेले. ‘मुहूर्ते जीबना ‘ म्हणजे क्षणिक जीवन. या क्षणिक जीवनातील विलक्षण असे क्षण या नृत्य नाटिकेतून उलगडत गेले.कोरोना काळातील जीवावरचे सर्व प्रसंग आणि नंतरचे जीवन त्यातून अनुभवण्यास मिळाले.

हा कार्यक्रम रविवार, ८ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा.अमरेंद्र साहू,रीना साहू यावेळी उपस्थित होते.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले.इप्सिता साहू यांनी निवेदन केले.

नृत्य गुरु स्तुती साहू (तारीझम -मुंबई )तसेच रसिका गुमास्ते(आकांक्षा ओडिसी नृत्यालय ) यांच्या मिळून एकूण २५ शिष्यानी प्रभावीपणे ओडिसी नृत्यातून भावना व्यक्त केल्या.रसिका गुमास्ते यांनी जगन्नाथ स्तुती,डमरू,अभंग नृत्यातून सादर केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२१ वा कार्यक्रम होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading