Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

ग्रिप्स महोत्सवाला सुरुवात; मौजमेळ्यात लहानग्यांची धमाल

पुणे : अभिनयाचे धडे, सेल्फी पॉइंटवरची धमाल, माइंड गेम्स, आवडती पुस्तके, फ्लॅश मॉब आणि नाटक अशी रेलचेल लहानग्यांना शनिवारी अनुभवता आली. निमित्त होते ग्रिप्स नाट्य महोत्सवाचे. रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रिप्स नाट्य महोत्सवाला शनिवारी (७ मे) सुरुवात झाली. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुलात झालेल्या या कार्यक्रमात आयोजक श्रीरंग गोडबोले, हृषिकेश देशपांडे, विभावरी देशपांडे, राधिका इंगळे आणि संगीतकार राहुल रानडे उपस्थित होते.

तब्बल दोन वर्षानंतर महोत्सव होत असल्याने सहभागी झालेल्या मुला-मुलींमध्ये उत्साह दिसून आला. सर्वप्रथम कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अभिनयाचे धडे गिरवले आणि त्यानंतर मौजमेळ्यात ही लहानगी रमली. या मौजमेळ्यात विविध सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले होते. या सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा आनंद सहभागींनी लुटला. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे मांडण्यात आलेल्या स्टॉलमध्ये माइंड गेम खेळले गेले. तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मांडण्यात आलेल्या पुस्तक स्टॉलला पालक आणि सहभागी बालकांनी प्रतिसाद दिला. यानंतर विभावरी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘प्रोजेक्ट अदिती’ नाटकाचा प्रयोग झाला. यामध्ये सुहानी धडफळे, प्रियांका गांधी, तेजस साने, संकेत पारखे, मंथन महाडिक, राधिका इंगळे, नितीन अग्निहोत्री, चंद्रशेखर कुलकर्णी, मुक्ता कम्पलीकर या कलाकारांचा सहभाग होता तर संगीत राहुल रानडे यांचे होते.

येत्या २२ मेपर्यंत हा महोत्सव सुरू असून किशोरवयीन मुलामुलींना याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये रोज विविध कार्यशाळा, मनोरंजन कार्यक्रम आणि नाटक यांचा समावेश आहे. यामध्ये ‘नको रे बाबा’, ‘प्रोजेक्ट अदिती’, ‘एकदा काय झालं’, ‘छान छोटे, वाईट्ट मोठे’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading