बावधन कचरा प्रकल्प हटावो यासाठी विविध संस्थांनी चे मानवी साखळी करुन निषेध
पुणे: माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी बावधन खुर्द स.नं. 64 याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र रद्द करण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव मांडला होता व या प्रस्तावास 29 डिसेंबर 2021 रोजी मान्यता देखील मिळाली होती. तरीही बावधन येथील रामनदी शेजारी सदर कचरा हस्तांतरण केंद्राचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याने , आज सकाळी 10 वाजता जुना जकात नाका, हॉटेल सुरभी शेजारी, पौड रोड, बावधन खुर्द, पुणे. याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र होवू नये यासाठी माजी खासदार प्रदीप रावत,नगरसेवक दिलीप वेडेपाटील, या परिसरातील हजारो नागरिक, दिलीप वेडेपाटील फाउंडेशन, वसुंधरा स्वच्छता अभियान, जीवितनदी, मिशन ग्राऊंड वाटर, पराडकर फौंडेशन, वसुंधरा क्लब, जलदेवता अभियान, जल बिरादरी अश्या विविध संस्थेच्या सहभागातून मानवी साखळी करून पुणे महानगरपालिका व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनाकडे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी दिलीप वेडे पाटील म्हणाले,कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प रद्द करण्याचा ठराव महापालिकेने मान्य केला असूनही जर याठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास या परिसरातील नागरिकांच्या रोषास पुणे महापालिकेला सामोरे जावे लागेल .व या परिसरातील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र जन-आंदोलन करण्यात येईल तसेच चांदणी चौकातून एकही पुणे मनपा ची कचरा गाडी या प्रकल्पाकडे येवू देणार नाही .असा इशारा नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनास दिला.
