वोडाफोन आयडिया फाऊंडेशन शाळांमध्ये रोबोटिक लॅब्स उभारणार
मुंबई : चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्रस्थान आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठीची पूर्वअट म्हणजे डिजिटल कौशल्ये. शालेय स्तरापासून भविष्यासाठी सज्ज प्रतिभावंत निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या उद्देशाने वोडाफोन आयडिया फाऊंडेशन या ‘वी’ च्या सीएसआर संस्थेने एरिक्सन इंडियासोबत भागीदारी केली असून त्याद्वारे देशभरातील दहा शाळांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक लॅब्स सुरु केल्या जाणार आहेत. वंचित समुदायांतील मुलांना नव्या युगातील शिक्षणाचे अनुभव मिळावेत आणि त्यांना भविष्यातील तंत्रज्ञान अभ्यासात सहभागी होता यावे हा यामागचा उद्देश आहे.
डिजिटल लॅब्स हा अभिनव शिक्षण कार्यक्रम ११ ते १४ वर्षे वयोगटातील शालेय मुलांना प्रोग्रामिंग आणि नवीन तंत्रज्ञानाच्या जगाची पहिली ओळख करवून देऊन त्याविषयी माहिती व मार्गदर्शन पुरवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. शिक्षणासाठी खुले वातावरण तयार करून या विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे साहस व आत्मविश्वास आणि समस्येचे निवारण करण्याचा दृष्टिकोन निर्माण करणे हा डिजिटल लॅब्सचा उद्देश आहे.
या भागीदारीमार्फत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात येथील वोडाफोन आयडिया फाऊंडेशन शाळांमध्ये दहा डिजिटल लॅब्स उभारल्या जातील.
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर व वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे डायरेक्टर पी बालाजी यांनी सांगितले, “डिजिटल युगामध्ये युवकांच्या सर्वांगीण वाढीसाठी डिजिटल कौशल्ये आत्मसात असणे ही गरज बनली आहे. शालेय विद्यार्थ्यांना कोडींग आणि रोबोटिक्स यांची ओळख व माहिती करवून दिल्याने त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो, समीक्षात्मक विचार करण्याची सवय लागते, सहयोगातून काम करण्याची मनोवृत्ती निर्माण होते आणि त्यांच्यासमोर संधींचे एक विशाल जग खुले होते.
एरिक्सनच्या दक्षिणपूर्व आशिया, ओशेनिया आणि भारत यांच्या सस्टेनेबिलिटी व कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी हेड सोनिया अप्लिन म्हणाल्या, “भारतातील विविध राज्यांमध्ये शिक्षक व शाळांना दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यात सक्षम बनवण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी डिजिटल लॅब्स उभारण्यासाठी वोडाफोन आयडिया फाऊंडेशनसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आयसीटीची अशाप्रकारे ओळख करवून दिली गेल्याने या युवा विद्यार्थ्यांना डिजिटली कुशल मनुष्यबळाचा भाग बनण्यासाठी तयार करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक व वैयक्तिक सक्षमतेमध्ये योगदान देण्यासाठी आणि त्यायोगे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी मजबूत पाया तयार होईल.”