Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

भोंग्याचा आवाज सत्याचा हवा, सत्तेचा नको – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणेः-  भोंगा या विषयावरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असून भोंग्याचा आवाज सत्याचा हवा, सत्तेचा नको असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज स्मृती शताब्दि निमित्त ‘मानव जोडो और भाईचारा बढाओ’ या अभियानांतर्गत यंदाचा छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार अॅड. डॉ. सुधाकरराव आव्हाड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड.प्रमोद आडकर होते. 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा पुणे मनपाच्या स्थायी समिती सदस्या लता राजगुरू आणि प्रेरणा गायकवाड, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग थोरवे आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक विठ्ठल गायकवाड, भाई कात्रेे, प्रेरणा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, महाराष्ट्राला लाज वाटावी अशी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संस्कृती सत्यावर उभी रहात असते. पंरतु, राजकारणी जाती-धर्माच्या नावावर विषाची पेरणी करीत आहेत. छत्रपती शाहूजी महाराज  राजे असूनही त्यांनी सातत्याने लोकशाहीच्या मूल्यांना चालना आणि प्रेरणा दिली. जाती-धर्माच्या भींतींच्या पलीकडे जाऊन शाहूजी महाराजांनी मुस्लीम कलकारांना देखील प्रोत्साहन दिले. महाराष्ट्राला आज शाहू महाराजांसारख्या बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक ऐक्याची भूमिका मांडणा-या नेत्याची गरज आहे. 

पुरस्काराला उत्तर देतांना अॅड. डॉ. सुधाकरराव आव्हाड  म्हणाले की, संपूर्ण भारतात महारष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु, अलीकडच्या काळात सुरू असलेले राजकारण पाहता पुरोगामी महाराष्ट्र या प्रतिमेला धक्का बसत आहे. महाराष्ट्राल फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचा वारसा लाभलेला असून त्या वारश्याला तात्पुरत्या राजकारणामुळे गालबोट लागायला नको. 

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड.प्रमोद आडकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading