किचन कल्लाकार मध्ये रंगणार सुपरस्टार क्रिकेटर्सचा मसालेदार सामना
झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात कलाकार नाही तर प्रेक्षकांचे लाडके क्रिकेटर्स या किचनमध्ये पाककलेच्या सामन्यात सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळी, सलील अंकोला आणि अमोल मुजुमदार या आठवड्यात प्रेक्षकांना महाराजांसाठी पदार्थ बनवताना दिसतील.
इतकंच नव्हे तर किचनमध्ये या क्रिकेटर्ससोबत खूप धमाल, मजा, मस्ती झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. क्रिकेटर्स सोबत खेळण्यात आलेले गेम्स देखील खूप मजेदार आहेत. विनोद कांबळी आणि सलील अंकोला यांना ग्लोव्स घालून शेंगदाणे सोलण्याचं आव्हान देण्यात आलं. तसंच विनोद कांबळी यांनी डायलॉग बोलून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. क्रिकेट मैदानावर पराक्रम गाजवणारे हे क्रिकेटर्स किचनमध्ये काय धुमाकूळ घालणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
