पीडीएफए तर्फे पुण्यातील फुटबॉल खेळाडू आणि संघांसाठी वर्षभरामध्ये विविध स्पर्धांची घोषणा !
पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटने (पीडीएफए) तर्फे २०२२-२३ या वर्षामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील फुटबॉल संघांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सर्वात लोकप्रिय आणि नामांकित पीडीएफए लीग या स्पर्धेसोबतच अनेक स्पर्धांची घोषणा आज रोजी करण्यात आली. तसेच पीडीएफएच्या नव्या ‘लोगो’ चेही यावेळी अनावरण करण्यात आले.
पत्रकार परीषदेमध्ये याबाबत अधिक माहिती देण्यात आली. यावेळी पीडीएफएचे सचिव प्रदीप परदेशी, उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी व मंदार ताम्हाणे, सहसचिव सिरील आशीर्वादम, पीडीएफए लीग सब-समितीचे अध्यक्ष रत्नदीप रॉय आणि युथ लीगचे परेश शिवलकर, ईशान कोल्हटकर, श्रीकांत अय्यर आदि उपस्थित होते. त्यांंनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ महामारीमुळे फुटबॉल क्षेत्रामध्ये स्पर्धा संयोजन आणि आयोजनासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे खेळाडू आणि सर्वांचेच नुकसान झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये पीडीएफएच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये विविध स्पर्धा आयोजनाचे ठरविण्यात आले होते. या धोरणानुसारच येत्या वर्षाभरामध्ये पीडीएफए तर्फे विविध वयोगटांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन या संघटनेशी सग्लन असलेलल्या पीडीएफए मध्ये या वर्षी २८४ संघांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी हा संघ नोंदणीचा आकडा १२५-१३० इतका होता. या वर्षी या संख्येमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ६, ८, १०, १२, १४, १६ वर्षाखालील गटासाठी तसेच महिला गट, तृतीय, द्वितीय, प्रथम आणि अव्वल श्रेणी गटासाठी ही नोंदणी झाली आहे.
कोविड-१९ मुळे पीडीएफए लीग २०२१-२२ ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ही रद्द झालेली स्पर्धा येत्या ९ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. महिला आणि पुरूष गटासाठी पीडीएफए लीग ही स्पर्धा पुण्यातील सप महाविद्यालय, एसएसपीएमएस महाविद्यालय मैदान, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकूलामधील दोन सराव मैदान येथे होणार आहे. तसेच पुण्यातील इतर उपलब्ध मैदानावर या स्पर्धेचे सामने आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा मे ते जुलै २०२२ या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा पीडीएफएचा मानस आहे. ६, ८ आणि १० वर्षाखालील वयोगटासाठी पीडीएफए शिशू लीग आणि १२, १४ आणि १६ वर्षाखालील वयोगटासाठी पीडीएफए युवा लीग स्पर्धा होणार आहेत.
यानंतर लगेचच पीडीएफए लीग २०२२-२३ या स्पर्धेचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेमध्ये आता महिला गट, तृतीय, द्वितीय, प्रथम आणि अव्वल श्रेणी गटासह एलिट गट असा नवीन गट तयार करण्याची शक्यता आहे. असा तयार केला गेला तर, या गटामध्ये लीगमधील अव्वल ८ संघ सहभागी असतील आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे.
सध्या गाजत असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट संकल्पनेवर आधारित ‘पुणे प्रिमिअर युथ लीग’ या स्पर्धेचेही आयोजन करण्याची योजना आहे. ही स्पर्धा ६, ८, १०, १२, १४ आणि १६ वर्षाखालील गटामध्ये होणार आहे. वयोगटानुसार ७-अ-साईड, ९-अ-साईड, ११-अ-साईड अशा फॉरमॅटमध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. स्पर्धेमध्ये ८ संघ मालक (फ्रँचाइझी) असणार असून पीडीएफए लीगमध्ये गुणवान आणि उत्तम सुमारे १५० ते २०० खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी होणार असल्याची योजना आहे. ऑगस्ट २०२२ पासून ही स्पर्धा आयोजित करण्याची पीडीएफएची योजना आहे.
२०२२-२३ मौसमामध्ये कॉर्पोरेट लीग स्पर्धा सुरू करण्याचा पीडीएफएची योजना असून या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तसेच कॉर्पोरेट इंडस्ट्रीतील विविध कंपन्यांमधील कर्मचारी आणि फुटबॉल खेळाडू भाग घेऊ शकणार आहेत.
नाशिकमध्ये आंतर-जिल्हा १७ वर्षाखालील महिला फुटबॉल स्पर्धेसाठी पुण्याचा संघ सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. महिला निवड चाचणी शिबीर सध्या पुण्यातील एसएसपीएमएस मैदान येथे सुरू असून त्यामधून पुण्याचा संघ निवडला जाणार आहे. पूजा धुमाळ आणि आशिष कटारा हे संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
अशाप्रकारे येत्या वर्षभरामध्ये पीडीएफएच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन करून पुण्यातील तसेच जिल्ह्यातील खेळाडूंचे कोविड-१९ मुळे झालेले नुकसान भरून काढण्याची योजना आहे. या स्पर्धांमुळे पुण्यातील फुटबॉल क्रिडाप्रकाराला एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धांमुळे अनेक गुणावान खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
