fbpx
Saturday, May 11, 2024
Latest NewsMAHARASHTRA

मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

मुंबई: अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” प्रदान केला. एप्रिल २०२२ मध्ये अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे परीचालनात संरक्षितता सुनिश्चित करण्यात कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान व कर्तव्यादरम्यानच्या सतर्कतेबद्दल भुसावळ विभागातील तीन, मुंबई, पुणे आणि नागपूर विभागातील प्रत्येकी दोन आणि सोलापूर विभागातील एक कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सौरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु.२०००/- रोख पुरस्कार आहे.

विजेंद्र यादव, ट्रॅक मेंटेनर, विद्याविहार, मुंबई विभाग, कर्तव्यावर असताना, घाटकोपर आणि विक्रोळी दरम्यान रात्रीच्या ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान एक ट्रेन जवळ येताना दिसली आणि त्यांनी त्वरित कारवाई करून ट्रेन थांबवली त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

नागोराव एस. केळकर, लोको पायलट, शंटर, कुर्ला, मुंबई विभाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यार्ड येथे ड्युटीवर असताना शंटिंग करताना त्यांना रेल फ्रॅक्चर दिसले आणि त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

आदित्य कुमार, पॉइंट्समन, भुसावळ विभाग हे सागफाटा, दि. ३०.३.२०२२ रोजी गुड्स ट्रेनला सिग्नलची देवाणघेवाण करताना ग्रीस जळत असल्याचे लक्षात आले परंतु ते ट्रेन थांबवू शकले नाहीत. त्यानंतर लगेचच स्टेशन मास्टर मार्फत पुढच्या स्टेशनला ही माहिती दिली. डोंगरगाव येथे तपासणी केली असता हॉट ॲक्सल निदर्शनास आले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला.

विक्की विलास कोचुरे, पॉइंट्समन, बिस्वा ब्रिज, भुसावळ विभाग, दि. १२.३.२०२२ रोजी रात्रीच्या ड्युटीवर असताना पासिंग मालगाडीच्या २५व्या वॅगनमध्ये हॉट एक्सेल दिसला. स्टेशन मास्तरांनी ट्रेन थांबवली आणि शंटिंग करून वॅगन अलग केली. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

आकाश भास्कर, ट्रॅक मेंटेनर-IV, बोदवड, भुसावळ विभाग, यांना दि. १.४.२०२२ रोजी शेजारील मार्गावरून जाणार्‍या ट्रेन क्रमांक 11039 च्या ६व्या डब्याच्या चाकातून धूर येताना दिसला. त्यांनी तत्काळ बोदवड स्टेशन मास्तरांना ही माहिती दिली. तपासणी केल्यावर ते ब्रेक बाइंडिंग आढळले. वेळीच कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळली.

सतीश मीना, लोको पायलट, गुड्स, नागपूर विभागातील आमला, दि. २६.३.२०२२ रोजी ट्रेन क्र. 19343 वर काम करत असताना त्यांना किरतगढ – कैसाला सेक्शनवर अप लाईनजवळ आग दिसली आणि त्यांनी अप ट्रेनला सतर्क केले आणि वॉकीटॉकीवर माहिती देऊन ट्रेन थांबवली. आग विझवल्यानंतर ट्रेन पुढे गेली. त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.

सुबोध कुमार तिलकधारी, नागपूर विभागातील काला आखर येथील वरिष्ठ विभाग अभियंता, रेल्वे ट्रॅक,यांनी केसला – किरथगढ विभागातील अप लाईन शेजारील जंगलातील आग विझवली, अन्यथा जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला असता. तसेच इतर गाड्यांसाठी सावधगिरीचे आदेश जारी केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

बी. सत्यनारायण, लोको पायलट,मेल आणि संत कुमार, सहाय्यक लोको पायलट, पुणे विभाग, दि. २०.४.२०२२ रोजी गाडी क्रमांक 12939 पुणे – जयपूर एक्स्प्रेसवर कार्यरत असताना डोंबिवली केबिनने वसई रोडऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सिग्नल दिला होता आणि चुकीच्या सिग्नलबद्दल केबिन स्टेशन मास्टर डोंबिवलीला कळवले आणि वसई रोडचा सिग्नल मिळाला. त्यामुळे ते चुकीच्या दिशेने जाणारी ट्रेन टाळू शकले.

विठ्ठल खंडू, तंत्रज्ञ I, सोलापूर विभागाचे सोलापूर यांनी दि. २८.३.२०२२ रोजी तपासणी करताना लक्षात आले की ट्रेन क्र. 18520 च्या पुढील ट्रॉलीच्या मागील चाकाच्या ब्रेक गियरमधून क्वार्टर पिन आणि वॉशर गहाळ झालेली आहे. ती दुरुस्त केल्यानंतरच ट्रेन पुढच्या प्रवासासाठी निघाली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.

यावेळी संबोधित करताना अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली २४ x ७ सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या संरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल.

बी.के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक; आलोक सिंग, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी; अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियंता; गोपाल चंद्र, प्रधान मुख्य विद्युत अभियंता; सुयश नारायण, मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता (मालवाहतूक) आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात व्हर्चुअली सामील झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading