fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पंचायतराज व्यवस्थेत पुणे जिल्हा परिषदेचे कार्य दिशादर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. ६० वर्षातील पुणे जिल्हा परिषदेची वाटचाल पथदर्शी अशीच आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुन बेनके, सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी १९६२ साली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तिवात आल्या. तेव्हापासून पुणे जिल्हा परिषदेने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास झाला पाहीजे. त्यासाठी सामुहीक प्रयत्न आवश्यक असतात.

जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचे काम अपेक्षित आहे. राज्यातील पंचायत समित्यांना दर्जेदार तसेच आवश्यक त्या सुविधा देण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच सांगली जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे सांगून त्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत असून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही शाळांसाठी निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा-खा. शरद पवार

माजी केंद्रिय मंत्री खा. शरद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी राज्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा आहे. पुणे जिल्हा परिषदेमधून २४ जिल्हा परिषद सदस्य आमदार तर ५ सदस्य मंत्री झाले आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेची इमारत अत्यंत चांगली आहे. या इमारतीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल होणारे काम व्हावे. महिलांना आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची संख्या वाढली आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने ६० वर्षात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण विकासाला चालना- गृहमंत्री वळसे पाटील

गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळते. पुणे जिल्हा परिषद गेल्या साठ वर्षापासून याच दिशेने काम करत आहे. जिल्हा परिषदा हे उद्याचे नेतृत्व घडविणाऱ्या संस्था आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक चांगले नेते राज्याला मिळाले. वाढत्या लोकसंख्येसोबत नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्यादृष्टीने विकासाच्या योजना राबविण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलद गतीने निर्णय होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद विकासाचा मार्ग दाखविणारी संस्था-ग्राम विकासमंत्री मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषद सर्व घटकांना विकासाचा मार्ग दाखविणारी संस्था आहे. राज्य शासन दरवर्षी पंचायतराज अभियान राबवत असून चांगले काम करणाऱ्या संस्थाचा गौरव करण्यात येतो. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. पुणे जिल्हा परिषदेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. कोरोना काळातही अनेक महत्वाचे निर्णय ग्रामविकास विभागाने घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषद एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. पुणे जिल्हा परिषदेचा १ ते ३८ महिला सदस्य हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील १ हजार किमी रस्ते ते १३ हजार किमी रस्ते ही वाटचालही उल्लेखनीय आहे. जिल्हा परिषदेत १ हजार १८३ विविध प्रकारची कामे होत असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या वाटचालीबाबत त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमात प्रोसेस मॅपींग या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading