सामूहिक कलाप्रदर्शनात अमूर्त अभिव्यक्तीत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन

पुणे : चित्रकार देवयानी ठाकरे, सुदिप्त अधिकारी, विनय जोशी, प्रतिक मलिक, जो मार्क्स, आणि नितेश मिश्रा यांच्या चित्रप्रदर्शन कोरेगाव पार्क परिसरातील मलाईका स्पाइस या कलादालनात भरवण्यात आले आहे. रोमर्टिकाद्वारे या सामूहिक कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘स्लो फॅशन’ संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैभवी रणावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात ठेवलेल्या चित्रांमध्ये मुख्यत: अमूर्त अभिव्यक्तीत्वाचे विविध पैलू दर्शविणारी चित्रे आणि नव्याने प्रचलित होणाऱ्या निष्क्रियात्मक कलाशैलीची वैशिष्ट्ये विशद करणारी चित्रे ठेवली आहेत. देवयानी ठाकरे यांच्या चित्रांमध्ये रंगकुंचल्यांचा वापर न करता केवळ हस्तकौशल्याने विविध रंगसंगतीतून साधलेला अमूर्त दुष्यपरिणाम सर्वांना आकर्षित करतो. तर सुदीप्त अधिकारी यांच्या चित्रांमध्ये गतिमानता, गुढ व काहीसे अनिश्चित दृश्यपरिणाम दर्शवणारी भासमयता व त्याचे वेगळेपण दाखवणारी आंतरिक तळमळ अनुभवायला मिळते. विनय जोशी यांच्या चित्रांमध्ये आधुनिक अमूर्त शैलीची अनुभूती येते.

चित्रकार प्रतिक मलिक यांच्या चित्रात कागदावर पेनने काढलेल्या शाईमध्ये कलात्मकतेचे रम्य दर्शन घडते. तसेच पोर्तुगलमधील रहिवासी असलेल्या जो मार्क्स यांच्या चित्रांमध्ये अमूर्त शैलीत साकारलेला निष्क्रिय असा उत्क्रांतीवाद सगळ्यांना एक वेगळीच अनुभूती देतो. नितेश मिश्रा याच्या जलरंगातील निसर्गचित्रांमध्ये एक आगळावेगळा साक्षात्कार रसिकांना अनुभवायला मिळत आहे. असे हे सामुहिक कलाविष्कार चित्र प्रदर्शन 22 एप्रिल पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: