शासकीय कामांची माहिती मिळून विश्लेषण व्हावे असे कोणत्याच सरकारला वाटत नाही – विवेक वेलणकर

पुणे : माहिती अधिकार कायदा येऊन सोळा वर्षे झाली परंतु आपले दुर्दैव असे कि ग्रामीण आणि शहरी भागात देखील खूप लोकांना हा कायदा माहिती नाही. यामध्ये शासनाचे अपयश आहे. हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यात शासन देखील कमी पडले आहे. नागरिकांना शासकीय कामाबद्दल माहिती व्हावी, त्याचे विश्लेषण व्हावे असे कोणत्याच सरकारला वाटत नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने संस्थेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा अरण्येश्वर येथील सुपर्ण हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.  सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अनिल शिदोरे, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधरपंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, सचिव शरद गर्भे उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना सार्वजनिक काका पुरस्कार, सुमेधा चिथडे यांना रमाबाई रानडे पुरस्कार, तर शिलरत्न  बंगाळे  यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते.

विवेक वेलणकर म्हणाले, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना पर्यावरणवादी म्हणजे विकासाच्या आड येणारा असेच चित्र निर्माण केले जाते.  पर्यावरण आणि विकास यांची सांगड घालता येऊ शकते हे लोकांच्या लक्षातच येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अनिल शिदोरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रबोधन ज्या संस्थांमुळे झाले त्यामध्ये पुणे सार्वजनिक सभेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. महाराष्ट्राचे सामाजिक मन या संस्थांनी तयार केले.  आज समाजातील सार्वजनिकता लयाला गेली आहे. प्रत्येक जण वैयक्तिक विचार करतो. समाजातील सार्वजनिकता परत येण्यासाठी वेगळे प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे एकत्रितरीत्या उत्सव साजरे केले जातात परंतु समस्यांविषयी कोणीही बोलत नाही. यासाठी नवीन पिढीतील  मुलांना मार्गदर्शन करायला हवे.

सुमेधा चिथडे म्हणाल्या, दुसऱ्यांनी देशासाठी काय करावे यामध्ये आपण वेळ वाया घालवतो, परंतु आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार करायला हवा. कौटुंबिक दुःखात आपण जगतो परंतु शहीद परिवाराच्या घरी गेलो तर त्यांच्यासमोर आपले दुःख थिटे वाटते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काहीही करावे लागले नाही परंतु स्वातंत्र्य टिकवण्यासाठी साठी काय करता येईल याचा विचार करायला हवा.  कोणाच्या जगण्यासाठी जगलो तरच ते खरे जगणे आहे.  भारत साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: