‘सर्वांसाठी पुणे’ या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील नागरिक आणि सार्वजनिक जागा यांच्यातील नातं उलगडणार

पुणे : शहरात सध्या सुरू असलेल्या बोंजोर इंडिया २०२२ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘सर्वांसाठी पुणे’ या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील नागरिक आणि सार्वजनिक जागा यांच्यातील नातं उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर प्रदर्शन  २३ आणि २४ एप्रिल २०२२ असे दोन दिवस दररोज सायंकाळी ५ वाजेपासून आयटीआय रस्ता औंध येथील, एफ क्युब’च्या समोरील जागेवर भरविण्यात येणार असून यात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

अलियॉस फ्रॉसेस दे पुणे, पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, एमआयएसटी एलजीबीटीक्यु फाउंडेशन आणि आरझू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्वांसाठी पुणे’ हा विशेष प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प बोंजोर इंडिया 2022 या उपक्रमाचा एक भाग आहे. हा उपक्रम भारतातील फ्रान्स दूतावास, भारतातील फ्रेंच संस्था, आलिआन्स फ्रान्सेज आणि फ्रान्सच्या वाणिज्य दूतावास यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. हा एक कलात्मक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम आहे.

‘सर्वांसाठी पुणे’ या प्रकल्पाबाबत माहिती देताना अलियॉस फ्रॉसेस दे पुणेच्या संचालिका अॅडेल स्पायझर म्हणाल्या,” या प्रकल्पांतर्गत सोशल डिझाईन कोलॅबोरेटिव्ह’चे वास्तुविशारद आणि पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी पुणे शहरातील येरवडा झोपडपट्टी, कोरेगाव पार्क, मोहम्मदवाडी, डहाणूकर कॉलनी, कसबा पेठ, मुकुंद नगर या सहा परिसरात जाऊन तेथील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे पुणे शहराशी असलेल्या नात्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून लिंग, ओळख, वय, क्षमता तसेच आर्थिक पार्श्वभूमी, वर्ग आणि जात यांसारख्या घटकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक जागांचा इतिहास, त्यांच्याशी निगडित कथा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वानिक जागांच्या वापराच्या पद्धती या विषया संबंधी माहिती संकलित केली जाईल. ही माहिती वर नमूद प्रदर्शनात सदर केली जाईल.

या उपक्रमाच्या क्युरेटर्सपैकी एक स्वाती जानू या वास्तुविशारद आणि कलाकार आहेत. त्यांनी शहराचे योग्य, सहभागात्मक नियोजन आणि सर्वसमावेशक सार्वजनिक ठिकाणे या मुद्द्यांवर बरेच काम केले आहे. या प्रकल्प आणि प्रदर्शनाबाबत त्या म्हणाल्या, “सर्वांसाठी पुणे या कला प्रदर्शनात विविध कलांच्या सादरीकरणातून सार्वजनिक ठिकाणांच्या निर्मिती व वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणांवर सध्या कोणाचा अधिक वावर असतो? महिला आणि समलैंगिक नागरिकांना स्वागतार्ह वाटतील, सुरक्षित आणि आरामदायी वाटतील अशी सार्वजनिक ठिकाणे आपण कशी तयार करू शकतो ? सर्व वयोगटातील, वर्गातील, जातीतील लोकांसाठी सार्वजनिक ठिकाणे ही वापरायोग्य कशी बनवू शकतो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या प्रदर्शनाचा प्रयत्न असेल.’’

सोशल डिझाईन कोलॅबोरेटिव्हच्या स्वाती जानू आणि शहरी मानववंशशास्त्राचे अभ्यासक ख्रिस ब्लॅश यांनी तयार केलेला हा प्रकल्प संवाद आणि कलेद्वारे सार्वजनिक ठिकाणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Reply

%d bloggers like this: