Thursday, April 30, 2026
Latest NewsPUNE

सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांची भागीदारी व्यवहार्य – डॉ विजय केळकर

पुणे : देशाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी केली जाणारी तरतूद अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे या सेवांचा दर्जा आणि व्याप्ती वेगाने सुधारण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांची भागीदारी व्यवहार्य ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ विजय केळकर यांनी शनिवारी केले. सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी केली जाणारी तरतूद ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्क्यांहून कमी असते आणि त्यामुळे या सेवा पुरविण्याच्या बाबतीत शहरी आणि ग्रामीण भागात मोठा असमतोल निर्माण होतो. यामुळेच या क्षेत्रात सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून प्रभावी काम होऊ शकते, असे ते म्हणाले.

डॉ केळकर पुणे ऑबस्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी च्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ पराग बिनीवाले यांनी या समारंभात सोसायटीचे २०२२-२३ या वर्षासाठीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. फेडरेशन ऑफ  ऑबस्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटीज च्या अध्यक्ष डॉ एस शांता कुमारी समारंभाच्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पुणे सोसायटी च्या मावळत्या अध्यक्ष डॉ सुनीता तांदुळवाडकर तसेच त्यांच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

“सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला खाजगी क्षेत्राकडून तज्ज्ञ सहभाग, अर्थिक बळ, कार्यक्षमता, नवी दृष्टी आणि तंत्रज्ञान मिळेल तर सरकार प्रारंभिक भांडवल पुरवेल तसेच या सेवांसाठी नियम तयार करणे आणि आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे या जबाबदाऱ्या उचलू शकेल, असे डॉ.  केळकर म्हणाले. मात्र हा बदल पचविण्याची मानसिकता नोकरशहा आणि सरकार यांना अंगिकारावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ शांता कुमारीम्हणाल्याकी स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, डॉक्टरांवर होणारे हल्ले या अनिष्ट गोष्टी रोखण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी कृतिशील झाले पाहिजे. सरकारी नियम आणि कायदे आहेतच पण त्यांच्या जोडीला आपणही काम केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

डॉ. पराग बिनीवाले यांनी पुणे सोसायटी से बत्तीसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर येत्या वर्षभरात कोणते उपक्रम हाती घेतले जातील याची रूपरेखा सादर केली. महिलांचे आरोग्य हे एक मोठे आव्हान आहे आणि निमशहरी किंवा ग्रामीण भागात ते अधिकच गंभीर आहे, त्यामुळे आरोग्य जागृती साठी अनेक नवे उपक्रम हाती घेतले जातील असे ते म्हणाले.
पुणे सोसायटी चे नवे सचिव  डॉ. आशिष काळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading